सत्ताधारी व विरोधक यांच्या छुप्या हालचालींना वेग : 23 जागांसाठी होणार लढत
कसबा बीड /प्रतिनिधी
कुंभी कासारी साखर कारखाना रणसंग्राम सुरू झाल्याने सत्ताधारी व विरोधक यांच्या छुप्या हालचालींना वेग आला आहे.पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कुंभी कासारी साखर कारखाना निवडणूक 23 जागांसाठी होणार लढत होणार आहे.शासनाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका 20 डिसेंबर पर्यंत थांबवल्या होत्या. 21डिसेंबर पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैभव नावडकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रदीप मालेगाव यांची निवड करण्यात आली आहे.त्यामुळे आता कुंभी कासारी पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी नरके गट व विरोधक राजर्षी शाहू आघाडी यांच्यामध्ये शड्डू ठोकला जात आहे.
करवीर, पन्हाळा, राधानगरी,गगनबावडा,व शाहूवाडी या तालुक्यातील 171 गावांचा समावेश आहे. यामध्ये अ वर्ग 23031 व ब वर्ग 364 मतदान आहे.23 जागांसाठी होणाऱ्या या लढतीमध्ये सत्ताधारी व विरोधक यांनी पुढील राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी गावोगावी व गटागटामध्ये छुप्या व प्रत्यक्ष भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.यामध्ये सत्ताधारी माजी आमदार चंद्रदीप नरके गट व राजर्षी शाहू आघाडी गट यांनी सावध पवित्रा घेत हालचालींना सुरुवात केली आहे.यामध्ये दोन्ही बाजूंना होणारी पॅनेलची बांधणी,इच्छुक उमेदवार व त्यांचे आपल्या प्रभागाशी व सभासदांची असणारे नाते,यावर कुंभी कासारी साखर कारखान्यांवर कोणाची सत्ता येणार?व कोणाचे अस्तित्व राहणार ? या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.









