कारखान्यांकडून ऊस दर जाहीर
जिह्यात 16 सहकारी व 7 खासगी कारखाने
कोल्हापूर
जिह्यातील 23 पैकी 22 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम 2024-25 साठी ऊसदर (एफ. आर.पी.) जाहीर केला असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी दिली. सहकारी साखर कारखान्यांमध्ये कुंभी आणि पंचगंगा कारखान्याचा उच्चांकी प्रतिटन 3300 रूपये तर खासगी कारखान्यांमध्ये ‘दालमिया’ 3300 रूपये एफआरपी जाहीर केली आहे. यामध्ये कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्याचा दर सर्वात कमी 3050 रूपये आहे.
कोल्हापूर जिह्यामध्ये 16 सहकारी व 7 खासगी असे एकूण 23 साखर कारखाने असून सर्व कारखाने चालू अवस्थेत आहेत. या अनुषंगाने पार पडलेल्या समितीच्या बैठकीमध्ये 15 नोव्हेंबर 2024 पासून राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरु करण्याबाबत निर्णय झाला आहे. त्यानुषंगाने गाळप हंगाम 2024-25 साठी कोल्हापूर जिह्यातील सर्व 23 सहकार व खासगी साखर कारखान्यांनी गाळप परवाने घेतले असून गाळप हंगाम 2024-25 चे ऊस गाळप सुरु केले आहे.
ऊस (नियंत्रण) आदेश 1966 मधील तरतुदीनुसार कारखान्यांनी हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसाचे 14 दिवसात देय एफआरपी प्रमाणे ऊस किंमत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा करणे प्रत्येक कारखान्यावर ऊस (नियंत्रण) आदेश, 1966 मधील कलम 3 (3) च्या तरतूदीनुसार बंधनकारक आहे. 14 दिवसाच्या कालावधीत एफआरपी देयके अदा न केल्यास विलंब कालावधीसाठी 15 टक्के प्रमाणे होणारे व्याज आकारण्याची तरतूद आहे. तसेच केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार व 21 फेब्रुवारी 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर केलेल्या एफ.आर.पी. दरापेक्षा जास्त दर द्यावयाचा असल्यास कारखान्यांनी तो निश्चित करुन हंगाम सुरु करण्यापूर्वी त्या दराची माहिती वर्तमानपत्र व कारखाना स्थळावर प्रसिध्द करणे बंधनकारक आहे.
कारखानानिहाय ऊस दर
कारखान्याचे नाव ऊस दर
आजरा साखर कारखाना 3100
भोगावती 3200
छत्रपती राजाराम 3050
छत्रपती शाहू 3100
दत्त शिरोळ 3140
दूधगंगा, बिद्री 3200
जवाहर, हुपरी 3150
सदाशिवराव मंडलिक, हमिदवाडा 3100
कुंभी-कासारी, कुडित्रे 3300
पंचगंगा, इचलकरंजी 3300
शरद, नरंदे 3150
वारणा 3220
अथणी शुगर, बांबवडे, 3220
गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी 3150
इको केन, चंदगड 3100
ओलम ग्लोबल अॅग्रो, राजगोळी, चंदगड 3100
संताजी घोरपडे 3100
ओंकार शुगर्स, फराळे 3200
अथणी शुगर फराळे 3100
आप्पासाहेब नलवडे, गडहिंग्लज दर जाहीर नाही








