कोल्हापूर- प्रा. एस पी चौगले
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून मल्लविद्येमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात नाव करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील पुरुष मल्लांसोबत आता महिला कुस्तीपटूंचा दबदबा सुरू झाला असून महिला कुस्तीगिरांना मासिक मानधन देण्याचा निर्णय घेणारा कुडीत्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. कारखान्याचे चेअरमन, आमदार चंद्रदीप नरके यांचे या निर्णयाबद्दल महिला कुस्तीगीरांनी कौतुक केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला कुस्तीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी देश-विदेशातील अनेक मल्लांना आपल्या राजवाड्यात राजाश्रय दिला होता. इतकेच नव्हे तर अशा देश-विदेशातील दिग्गज पैलवानांची अनेक जंगी कुस्ती मैदाने शाहू खासबाग मैदानामध्ये भरवली होती. त्यामुळे आजही “कुस्तीपंढरी” म्हटले की कोल्हापूरचे नाव नजरेसमोर येते.या जिल्ह्याने देशाला गणपतराव आंदळकर,श्रीपतराव खंचनाळे,दिनानाथसिंह,दादू चौगले, युवराज पाटील,चंबा मुत्नाळ,संभाजी पाटील, विनोद चौगले यांच्यासारखे अनेक हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी मल्ल दिले आहेत.कुस्तीचा राजाश्रय संपल्याने अनेक साखर कारखान्यांनी मानधनधारक कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून पुरुष कुस्तीगिरांना मासिक मानधन देण्यासाठी मॅटवरील कुस्ती स्पर्धा सुरू केल्या आहेत.
कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय डी.सी.नरके व त्यांच्या तत्कालीन संचालकांनी ३३ वर्षांपूर्वी कारखाना कार्यक्षेत्रातील पैलवानांना मासिक मानधन देण्यासाठी मॅटवरील वजनगट कुस्ती स्पर्धा सुरू केल्या. या कुस्ती स्पर्धेतून जिल्हा, राज्य व देशाला अनेक नामांकित मल्ल मिळाले. त्यामुळे सामान्य कुटुंबातील कुस्तीगीरांना या मानधनाची चांगलीच साथ लाभली आहे.परिणामी पुरुष कुस्तीगिरांची संख्या वाढत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आता महिला कुस्तीगीर सुद्धा कुस्तीमध्ये पुढे येत आहेत. मात्र अशा महिला कुस्तीगीरांना घडवत असताना पालकांची आर्थिक ओढाताण होत आहे,व त्यांना घडवण्यात मर्यादा येत आहेत. हे ओळखून कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,नवनिर्वाचित आमदार चंद्रदीप नरके यांनी यावर्षी धाडसी पाऊल उचलुन मॅटवरील महिला कुस्ती स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. एकूण पाच गटात या महिला कुस्ती स्पर्धा पार पडल्या. कारखाना कार्यक्षेत्रातील २९ महिला कुस्तीगीरांनी यामध्ये भाग घेतला.मात्र याची माहिती अनेक महिला पैलवानाना नसल्यामुळे त्यांना या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. अशा महिला कुस्तीगीरांच्या पालकांनी सर्व गटातील कुस्ती स्पर्धा घ्याव्यात असे चेअरमन, आमदार नरके यांना सुचवले. कारखान्याच्या रविवारी झालेल्या बक्षीस वितरण समारंभात आमदार नरके यांनी पुढील वर्षी पुरुष विभागातील १२ गटाप्रमाणे महिलांच्या सुद्धा गटवार स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.इतकेच नव्हे तर पुरुष विभागातील १२ गटातील विजेत्या मल्लांना जेवढे मानधन दिले जाते, तेवढेच मानधन या महिला गटातील
कुस्तीगीरांना देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी एक प्रकारे स्त्री-पुरुष समानतेचा नारा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचे महिला कुस्तीगीरांच्या पालकांकडून जोरदार स्वागत होत आहे.अशा पद्धतीचा निर्णय घेणारा कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना हा राज्यातील कदाचित पहिलाच कारखाना असण्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आमदार नरके यांनी या पुढील काळात या कुस्ती मैदानात महिलांची संख्या वाढेल आणि त्या नक्कीच ऑलिंपिकमध्ये देशाला पदक मिळवून देतील असा विश्वास व्यक्त केला. या निर्णयाचे महाराष्ट्रातील तमाम महिला कुस्तीगीरांकडून स्वागत होत आहे.
कुंभीकडून महिला सन्मान
आंतर राष्ट्रीय कुस्तीपट्टू कस्तुरी कदम (शिरोली दुमाला)
हिने कुंभी कारखाना व चेअरमन आमदार चंद्रदीप नरके यांनी महिला कुस्ती स्पर्धा सुरू करून महिला कुस्तीगीरांचा सन्मान केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
कस्तुरी कदम, महिला कुस्तीपटू

सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर
आमदार चंद्रदीप नरके यांनी आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून त्या पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कार्य करीत आहेत,त्यांना समानतेचा हक्क द्यावा म्हणून त्यांना पुरुष मल्लांच्या बरोबरीने मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगितले.
आमदार चंद्रदीप नरके








