रामायणातील रावणाचा बंधू कुंभकर्ण याची कथा सर्वांना परिचित आहे. त्याला एकदा झोप लागली की तो सहा महिने जागा होत नसे. त्याला त्याच्या त्या प्रदीर्घ झोपेतून उठविण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागत असत, असा उल्लेख रामायणात आहे. सध्याच्या कलियुगातही झोप अनावर होणारे अनेक लोक असतात. त्यांना कामाच्या स्थानीही पेंग काढण्याची इच्छा अनावर होते. अनेक लोक प्रवासात, बसथांब्यावरही उभ्याउभ्या थोडी झोप काढतात. पण हे केवळ मानवाचेच वैशिष्ठ्या नाही. पक्षी प्रजातींमध्येही असा एक कुंभकर्णी झोपेचा पक्षी आहे.
चिनस्ट्रॅप पेंग्विन असे या पक्षाचे नाव आहे. तो दिवसभरात किमान 10 हजारवेळा पेंगतो. त्याची एकंदर झोप प्रतिदिन 11 तासांहून अधिक असते. हा पक्षी केवळ जास्त झोपतो असे नाही. जागा असतानाही तो अत्यंत आळशी असतो. त्याच्या झोपेवर अनेक पक्षीतज्ञांनी संशोधन केले आहे. कोरिया ध्रूवीय संशोधन केंद्र आणि लिऑन मज्जाशास्त्र संशोधन केंद्र या दोन जागतिक ख्यातीच्या संशोधन संस्थांनी अद्यापही संशोधन चालविले आहे. त्याच्या झोपेचे अनेकदा व्हिडीओ चित्रण करण्यात आले आहे.
या चित्रणाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यात आला आहे. अशी झोप हा त्याच्या जीवनशैलीचाच भाग आहे. तो हेतुपुरस्सर असे करत नाही. त्याचे घरटे भूमीवरच असल्याने त्याला घरटे आणि अंडी यांच्या संरक्षणासाठी अधिक काळ गाढ झोपता येत नाही. त्यामुळे तो दिवसातून हजारोवेळा पेंगून आपली झोपेची आवश्यकता भागवून घेतो. असा हा पेंगणारा पेंग्विन पक्षी प्रजातीतील एक वैशिष्ट्यापूर्ण जीव मानला गेला आहे.









