प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेस सरकार ‘वायएसटी’ कर लागू करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि निजदचे वरिष्ठ नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केला होता. सोमवारी त्यांनी पुन्हा आरोपांच्या फैरी झाडल्या. राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार होत आहे. परिवहन व महसूल खात्यानंतर आता वाणिज्य कर खात्यात बदल्यांसाठी कंपूशाही निर्माण झाली आहे. राज्यपालांच्या भाषणातून सरकारने भ्रष्टाचार निर्मूलन करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, पैशांसाठी अव्याहतपणे बदल्या सुरू आहेत. प्रत्येक पदासाठी दर निश्चित केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात लाच दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. केवळ आमदारांचे पत्र घेऊन आल्यास चालणार नाही. त्यासोबत 30 लाख रु. घेऊन येण्याची मागणी तेथील अधिकारी करत आहेत, असा आरोपही कुमारस्वामींनी केला.









