प्रतिनिधी / बेळगाव
स्वर्गीय पंडित भगवंतराव उर्फ बाळासाहेब कुलकर्णी-बेडकीहाळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शनिवार दि. 11 व रविवार 12 मार्च रोजी संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोनवाळ गल्लीतील लोकमान्य रंगमंदिरात सायंकाळी 5.30 वाजता कार्यक्रमाला सुऊवात होईल. एकूण तीन सत्रात हा कार्यक्रम होणार असून त्याचे आयोजन पुढीलप्रमाणे आहे.
दि. 11 रोजी सायंकाळी 5.30 वाजता बेळगावचे श्रीधर कुलकर्णी यांचे गायन होणार असून त्यांना तबल्यावर ऋषिकेश सुरवसे आणि संवादिनीवर अमेय बिच्चू साथ करणार आहेत. गायनानंतर स्व. पं. बाळासाहेबांच्या बेळगावातील संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल नंदन हेर्लेकर यांचे भाषण होणार असून त्यानंतर सुप्रसिद्ध तबला वादक पं. रामदास पळसुले यांचे स्वतंत्र तबला वादन होणार आहे.
दि. 12 रोजी सकाळी 10.30 वाजता दुसरे सत्र पुण्याचे सोनिक वेलिंगकर यांच्या बासरी वादनाने सुरू होईल. त्यांना पुण्याचे श्रीकांत भावे तबलासाथ करणार आहेत. त्यानंतर पुण्याचे अमोल निसळ यांचे गायन होणार असून त्यांच्याबरोबर तबल्यावर गणेश तानवडे आणि संवादिनीवर रवींद्र माने संगत करणार आहेत. सायंकाळी 5.30 वाजता सुरू होणाऱ्या अखेरच्या सत्रात प्रथम बेळगावचे युवा गायक आकाश पंडित यांचे गायन होणार असून त्यांच्याबरोबर संवादिनी योगेश रामदास आणि तबल्यावर अंगद देसाई संगत करणार आहेत. त्यानंतर सुप्रसिद्ध लेखिका, अनुवादकार आणि पं. बाळासाहेबांच्या कन्या उमा कुलकर्णी आपल्या वडिलांचे व्यक्तित्व शब्दबद्ध करतील. शेवटच्या सत्रात पं. बाळासाहेबांचे चिरंजीव आणि शिष्य पं. राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरी वादन होणार असून त्यांना गोव्याचे उदय कुलकर्णी तबलासाथ करणार आहेत. कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.









