आग मुद्दामहून लावल्याचा पंचायतीचा आरोप : गुन्हेगारास त्वरित अटक करण्याची मागणी,शनिवारी मध्यरात्रीनंतरची दुर्घटना
धारबांदोडा : विकासवाडा – कुळे येथील कुळे शिगांव ग्रामपंचायतीच्या कचरा प्रकल्पाच्या शेडला अज्ञाताने आग लावल्याने लाखो ऊपयांच्या मालमत्तेची नुकसानी झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर हा आग लावण्याचा प्रकार घडला आहे. आगीत विविध प्रकारची यंत्रे जळून खाक झाली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार 80 लाख ऊपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून ग्राम पंचायत मंडळाकडून अज्ञांताविरूद्ध कुळे पोलिसस्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आग लावण्याचा प्रकार हा अत्यंत दुर्दैवी असून आग जाणूनबुजून लावण्यात आलेली आहे. पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक करावी अशी मागणी कुळे पंचायत मंडळातर्फे करण्यात आली आहे. कुळे हे जागतिक पर्यटन केंद्र आहे येथील परिसर स्वच्छ ठेवण्याचा पंचायतीकडून प्रयत्न केला जात आहे. मात्र अशा प्रयत्नांना खो घालण्याचे काम विघ्नसंतोषी माणसे करीत आहेत. मात्र असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा सरपंच गोविंद शिगांवकर यांनी दिला आहे. स्थानिक पंचसदस्य सौ. अश्विनी देसाई यांनीही या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करून अशा प्रकारामुळे पंचायतीचे नाव खराब होत आहे. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आरोपीला त्वरित अटक करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान मागील काही दिवसांपासून कुळे पंचायत क्षेत्रात बरेच अनुचित प्रकार घडत असून पोलिसांनी सतर्क राहून रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रिवण येथे दोन दुकाने खाक : 15 लाखांची हानी अन्य दुकानांनाही फटका
रिवण-सांगे येथे शनिवारी रात्री अचानक हार्डवेअर व स्वस्त धान्याच्या दुकानात आग लागून 15 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज असून कुडचडे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तीन तासांच्या मेहनतीनंतर ही आग विझविली. शनिवारी रात्री 12 च्या दरम्यान रिवण बाजारातील हार्डवेअरच्या दुकानात आग लागल्याचे कळल्यानंतर याची माहिती लोकांनी कुडचडे येथील अग्निशामक दलाला दिली. मात्र आग इतकी मोठी होती की, त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता आणखी दोन बंब मागवून घ्यावे लागले. तसेच याच हार्डवेअरच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या रेशनच्या दुकानातही आग लागली. त्याशिवाय येथे असलेल्या आणखी दोन दुकानांनाही काही प्रमाणात या आगीचा फटका बसला आहे. मात्र सज्जन नाईक यांच्या हार्डवेअरच्या दुकानाचे बरेच नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. बाजूला असलेल्या स्वस्त धान्याच्या दुकानाचीही हानी झाली आहे. यासंबंधी कुडचडे अग्निशामक दलाचे निरीक्षक जांबावलीकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, रिवण येथील दुकानांना लागलेली आग विझविण्यासाठी आणखी 2 बंबांची मदत घ्यावी लागली. आग विझविण्यास सुमारे तीन तास लागले तसेच प्राथमिक अंदाज सुमारे 15 लाख रुपये हानीचा असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे









