वृत्तसंस्था /मेलबोर्न
भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने अलिकडेच येथील मेलबोर्न क्रिकेट मैदानाला आपल्या कुटुंबियांसमवेत सदिच्छा भेट दिली. मेलबोर्नच्या या ऐतिहासिक मैदानाच्या प्रांगणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख कार्यालय आहे.
मेलबोर्नच्या क्रिकेट प्रांगणामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज दिवंगत शेन वॉर्नचा पुतळा आहे. कुलदीप यादवने या पुतळ्याजवळ आपले छायाचित्र घेतले. याप्रसंगी कुलदीपने शेन वॉर्नच्या क्रिकेट कारकिर्दीतील काही जवळीक क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख कार्यालयामध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निकी हॉक्ले यांनी कुलदीप यादवचे स्वागत केले. चालु वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. ही मालिका अटितटीची होईल. दरम्यान ऑस्ट्रेलियातील क्रिकेट शौकिन या मालिकेचा आस्वाद घेण्यासाठी आतुरलेले असल्याचे हॉक्ले यांनी सांगितले.









