वृत्तसंस्था / दुबई
बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसीच्या गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. तर द. आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज पुन्हा अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
केर्न्स येथे झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवशीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला 98 धावांनी हरवण्यास मदत केल्यानंतर महाराजने पुन्हा अव्वल स्थान मिळविले. 33 धावांत 5 बळी घेत सामनावीर म्हणून निवड झालेल्या 35 वर्षीय डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने कुलदीप आणि श्रीलंकेच्या महेश थीक्ष्णाला मागे टाकून अव्वल स्थान पटकाविले. जे त्याने यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये काही काळासाठी स्थान राखले होते. कुलदीप व्यतिरिक्त, रविंद्र जडेजा हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. जो अद्ययावत यादीत टॉप 10 मध्ये आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेतेपद मिळवल्यानंतर भारतीय संघाने एकही एकदिवशीय सामना खेळलेला नाही.
पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्यामालिकेतील शेवटच्या सामन्यात 18 धावांत सहा बळी घेत वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सने गोलंदाजी क्रमवारीत मोठी प्रगती केली आहे. तो 15 स्थानांनी पुढे जाऊन 18 व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा लेग-स्पिनर अबरार अहमद (15 स्थानांनी पुढे संयुक्तपणे 339 व्या स्थानावर) आणि वेस्ट इंडिजचा ऑफ-स्पिनर रोस्टन चेस )पाच स्थानांनी पुढे 58 व्या स्थानावर) हे देखील या यादीत वरच्या स्थानावर आहेत.
पुरुषांच्या फलंदाजी क्रमवारीत शुभमन गिल 784 गुणांसह यादीत अव्वल स्थानावर आहे. तर श्रेयस अय्यर सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या एकदिवशीय सामन्या नाबाद 120 धावा काढल्यानंतर वेस्ट इंडिजच्या कर्णधार शाई होप दोन स्थानांनी पुढे जाऊन नवव्या स्थानावर पोहोचला आहे. तर एडेन मार्कराम (चार स्थानांनी पुढे 21 व्या स्थानावर), टेम्बा बावूमा (पाच स्थानांनी पुढे23 व्या स्थानावर) आणि मिचेल मार्श (सहा स्थानांनी पुढे 48 व्या स्थानावर) हे इतर खेळाडू आहेत. पुरुषांच्या टी-20 क्रमवारीत, भारताचा अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा पहिल्या दोन स्थानांवर आहेत. द. आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेव्हिसने 9 स्थानांची प्रगती करत 12 व्या स्थानावर पोहोचला आहे तर ऑस्ट्रेलियाचे मार्श आणि ग्लेन मॅक्स्वेल अनुक्रमे चार आणि 10 व्या स्थानांची प्रगती करत 23 व्या आणि 30 व्या स्थानावर पोहोचले आहेत. टी-20 गोलंदाजीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज नाथ्न एलिस (तीन स्थानांची प्रगती करुन नवव्या स्थानावर) आणि जोश हेझलवूड (दोन स्थानांची प्रगती करुन 18 व्या स्थानावर) यांनी लक्षणीय प्रगती केली आहे. तर द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा 44 व्या स्थानावरुन 37 व्या स्थानावर पोहोचला आहे.









