वृत्तसंस्था / दुबई
नवी दिल्ली येथे वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात आठ बळी घेतल्यानंतर भारताचा डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने बुधवारी आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 14 वा क्रमांक मिळवला.
यादव सात स्थानांनी पुढे गेला तर वेस्ट इंडिजचा जोमेल वॉरिकन आणि कर्णधार रोस्टन चेस अनुक्रमे दोन आणि चार स्थानांनी पुढे येवून 30 व्या आणि 57 व्या स्थानावर पोहोचले आहेत. फलंदाजी क्रमवारीत भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल नवी दिल्ली सामन्याच्या पहिल्या डावात 175 धावा काढल्यानंतर तो दोन स्थानांनी पुढे सरकला आहे. तर के.एल. राहुलने 38 आणि 58 धावांच्या नाबाद खेळीमुळे तो दोन स्थानांनी पुढे सरकला आहे. दुसऱ्या डावात शतके झळकावणारे शाय होप (3 स्थानांनी पुढे सरकून 66 व्या स्थानावर) आणि दुसऱ्या डावात शतके झळकावणारे जॉन कॅम्पबेल (सहा स्थानांनी पुढे सरकून 68 व्या स्थानावर) या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना फायदा झाला आहे.
दरम्यान, अबूधाबीमध्ये बांगलादेशविरुद्ध 3-0 अशा मालिकाविजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानंतर अफगाणिस्तानचा लेग स्पिनर रशीद खान एकदिवशीय गोलंदाजी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दुसऱ्या सामन्यात पाच विकेट्ससह मालिकेत 11 विकेट्स घेणारा रशीद पाच स्थानांनी पुढे सरकला आहे आणि 710 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. जो दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजपेक्षा 30 ने जास्त आहे. रशीद सप्टेंबर 2018 मध्ये पहिल्यादांच नंबर 1 बनला होता. तो शेवटचा नोव्हेंबर 2024 मध्ये या स्थानावर पोहोचला होता. सीम गोलंदाज अझमतुल्लाह उमरझाईने मालिकेत सात विकेट्ससह 19 स्थानांची झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम 21 वे स्थान मिळविले आहे. तर बांगलादेशचा मेहदी हसन मिराज (चार स्थानांनी प्रगती करीत 24 व्या स्थानावर) आणि तन्झिम हसन सकीब (24 स्थानांनी पुढे सरकत 67 व्या स्थानावर) यांनीही गोलंदाजी क्रमवारीत सुधारणा केली आहे.
इद्रनसाठी नवीन उच्चांक
फलंदाजी क्रमवारीत, इब्राहीम झद्रनने आठ स्थानांनी झेप घेत कारकिर्दीतील सर्वेत्तम दुसरे स्थान गाठले आहे. त्याने एकूण 213 सर्वाधिक धावा केल्या आहेत. ज्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने अफगाणिस्तानतर्फे आतापर्यंतचे सर्वाधिक फलंदाजी रेटिंग मिळवले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये रहमानुल्लाह गुरबाजने मिळवलेले 686 गुण मागे टाकले आहेत आणि त्याचे दुसरे स्थान त्याच्या देशाच्या कोणत्याही एकदिवशीय फलंदाजाने मिळवलेले सर्वोच्च स्थान आहे. रहमानुल्लाह (दोन स्थानांनी प्रगती करीत 16 व्या स्थानावर) आणि बांगलादेशच्या तौहिद हृदॉय (सात स्थानांनी प्रगती करीत 42 व्या स्थानावर) आणि मोहम्मद नबी (सहा स्थानांनी बढत मिळवित 50 व्या स्थानावर) यांनीही फलंदाजी क्रमवारीत सुधारणा केली आहे.









