कुद्रेमनी/प्रतिनिधी
शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घेण्याबाबतची चर्चा व ठराव होऊन कुद्रेमनी ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीत नुकतीच झाली. 2024-25 सालातील पहिल्या सत्रातील सभेचे आयोजन ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी ग्रा.पं.अध्यक्षा संजय पाटील होते. यावेळी शासनाच्या फलोत्पादन विभागाचे अधिकारी प्रवीण महेंद्रकर व कृषी खात्याचे अधिकारी नाईक यांनी नोडल अधिकारी म्हणून सभेचे कामकाज पाहिले.
पीडिओ सुमित्रा मिरजी यांनी स्वागत करून प्रास्ताविकात सभेचा उद्देश कथन केला. सचिव हणमंत किल्लेकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. यानंतर अध्यक्ष संजय पाटील, सदस्य शांताराम पाटील, अरुण देवण, विनायक पाटील, शिवाज मुरकुटे, विमल साखरे, लता शिवणगेकर, आरती लोहार, मल्लव्वा कांबळे, पशुवैद्यकीय खात्याचे भद्र्रकाती, केव्हीजी बँकेचे उज्ज्वला मास्तमर्डी आदींनी शासकीय योजनांची माहिती सांगून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
म. गांधी उद्योग खात्री अनुदान योजना, स्वच्छ भारत अभियान, महिला व बाल कल्याण वसती योजना, ग्रा.पं.मिळकत, करवसुली, दारुबंदी, विद्युत बिल भरणा, शासनाची 15 वी हमखास कामगिरी क्रिया योजना, आपले गाव आपली योजना, एससीएसटी वर्गासाठी असलेल्या सवलती, अपंगांसाठीच्या शासकीय सवलती आदी लाभदायक योजनांची माहिती देवून ठराव मंजूर करण्यात आले.
उद्योग खात्रीतील कामगारांना काम देणे, नाल्यावर पूल बांधण्यासाठी शासनाने अनुदान मंजूर करणे, ठिबक सिंचन योजनेला अनुदान देणे, विहिरींची खोदाई, फळबागा, जनावरांसाठी गोठा बांधकाम करणे, शेळीपालनकरिता शासनाच्या अनेक सवलती आहेत. त्याचबरोबर शेती कामासाठी ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर खरेदीसाठी शहापूर बेळगाव येथील कृषी कार्यालयाकडे अर्ज देणे, माहिती उपस्थितांना यावेळी दिली.
यावर्षी एकाही घराची तरतूद नसल्याची खंत
गोरगरिबांसाठी 30 ते 35 घरे ग्रामसभेदरम्यान मंजूर व्हायची. यावेळी एकाही घराची तरतूद नसल्याची खंत अध्यक्षानी व्यक्त केली. याचबरोबर यंदा मोठा पाऊस झाला. पूरग्रस्त परिस्थितीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाने केवळ सहा हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद केली आहे. पण ही रक्कम परवडणारी नसून दोन ते तीन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी केली.
यावेळी ग्रामसभेला ग्रा. पं. सदस्य, विविध शासकीय खात्याचे अधिकारी, ग्रा.पं.कर्मचारी, नागरिक सातेरी कदम, भरमा नाईक, इंदू मांडेकर, आश्विनी काकतीकर, मनीषा कांबळे, रेखा निकम, उज्ज्वला अंबाजी, प्रकाश कांबळे, सुरेश शिवणगेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सदस्य विनायक पाटील यांनी आभार मानले.









