कुदनूर / प्रतिनिधी
कुदनूर येथील सिद्धेश्वर मंदिरालगतच्या तलावात बुडून बालकाचा दूर्दैवी अंत झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून महेंद्र कमल सारथी (वय ४) (मूळगाव नेपाळ, सध्या राहणार कुदनूर) असे त्या दूर्दैवी बालकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, सारथी कुटुंब हे कुदनूर येथे काही वर्षापासून वास्तव्याला असून, येथील चायनिज सेंटरमध्ये हे कुटुंब काम करत आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास महेंद्रला खेळण्यासाठी त्याची आई त्याला घेऊन सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेली होती. सिद्धेश्वर मंदिराचा परिसर मोठा असून, येथे खेळण्यात महेंद्र दंग झाला होता. बराचकाळ तो मंदिराच्या परिसरात खेळत होता. मात्र, खेळता खेळता त्याचे लक्ष मंदिरालगत असलेल्या तलावातील माशांकडे गेले. तलावात उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्यावरून तो त्या माशांना खाऊ टाकत होता. काही काळाने महेंद्रची आई त्याला घरी घेऊन जाण्यासाठी शोधू लागली मात्र तो तेथे निदर्शनास आला नाही. त्यामुळे त्याला शोधत शोधत ती घरी गेली पण तेथेही तो आढळून आला नाही. पुन्हा मंदिर परिसरात शोधाशोध केली असता तलावात उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्यावर महेंद्रचे चप्पल निदर्शनास आल्यामुळे तो तलावात बुडाला असावा असा समज झाला. त्यामुळे काही ग्रामस्थांनी तलावात उतरुन पाहिले असता तलावात महेंद्र आढळून आला. त्याला तलावाबाहेर काढून तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तलावात उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्यावर शेवाळ असल्यामुळे त्यावरून पाय घसरुन तो पाण्यात बुडला असावा, अशी चर्चा परिसरात होत आहे. महेंद्रवर सायंकाळी उशिरा अंत्यविधी करण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण, भाऊ असा परिवार आहे.