प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे-काकोडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 35 व्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या देणगी कूपन विक्रीचा नुकताच स्थानिक आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, कुडचडे-काकोडा नगराध्यक्षा जस्मिन ब्रागांझा, कुडचडे भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास सावंत, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर नाईक, सचिव नारायण शेटय़े, खजिनदार नवीन खांडेकर, रोश पेरेरा, व्यवस्थापक रोहिदास मडकईकर, अशोक नाईक, जयकुमार खांडेकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे प्रत्येक उत्सव साजरे करण्यात अडथळे आले. गणेश चतुर्थी साजरी करण्यातही भरपूर अडथळे निर्माण झाल्यामुळे उत्सवाचा आनंद लोकांना लुटता आला नाही. पण सध्या महामारीचा ताप बऱयाच प्रमाणात कमी झाला असून यंदा सर्वांना गणेश चतुर्थीचा आनंद घ्यायला मिळेल ही आनंदाची गोष्ट आहे, असे मंत्री काब्राल यांनी यावेळी बोलताना सांगितले. कुडचडे-काकोडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मोठय़ा उत्साहात ज्या देणगी कुपनांच्या विक्रीचा शुभारंभ घडवून आणला आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन काब्राल यांनी केले. सूत्रसंचालन जयकुमार खांडेकर यांनी केले, तर आभार समीर नाईक यांनी मानले.









