जिल्हा कृषी पशुधन विकास शेतकरी संघाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
कुडाळ ; वार्ताहर
बैल विक्री व्यवसायावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आहे.कुडाळ शहरात ग्रामपंचायत कार्यकाळात बैल विक्री बाजार भरायचा. तो बंद झाल्याने सदर व्यावसायिकांचे आर्थिक चलन बंद झाले आहे.तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.त्यामुळे कुडाळचा बैल विक्री बाजार पूर्ववत सुरू करावा,अशी मागणी सिंधुदूर्ग जिल्हा कृषी पशुधन विकास शेतकरी संघाच्या वतीने कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्याकडे सादर केले. सिंधुदूर्ग जिल्हा कृषी पशुधन विकास शेतकरी संघाचे बबलू भोगटे ,हाजीम मुजावर , अवि शिरसाट, शाहीद शेख,अभिषेक वाटवे,संदीप मयेकर , पिवो खतिफ व अन्य या संघाचे सदस्य व शेतकरी उपस्थित होते. आमचा उदरनिर्वाह हा शेती व तत्सम व्यवसायावर अवलंबून आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील बहुतांशी शेतकरी हा गाई, म्हशी, बैल इत्यादींचे पालन करून आपला उदरनिर्वाह करीत असतो. कुडाळ शहरात ग्रामपंचायत कार्य काळात बैल बाजार सुरू होता. आठवडा बाज्रारा दिवशी हा बाजार भरायचा.बैल, म्हैस, गाय खरेदी विक्रीचे व्यवहार यात व्हायचे. जिल्ह्यातील शेतकरी या बाजाराला यायचा.परंतु सदर बैलं विक्री बाजार गेली काही वर्षे कोरोना काळात बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी राजाला बैल विक्री करणे अत्यंत कठीण झाले आहे. तसेच म्हैस , गाय आदी दुभत्या जनावरांची खरेदी विक्री व्यवहार होत नाहीत. हा बाजार बंद झाल्याने पर जिल्हयात शेतीला लागणाऱ्या जनावरांची खरेदी विक्री करणे शेतक-याला अवघड होत आहे. कुडाळ शहरातील आपल्या अखत्यारीत येणारा बैल विक्री बाजार पूर्ववत सुरू करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे. त्यासाठी आपल्या नगरपंचायतीचा बैल विक्री कर भरण्यासाठी आम्ही शेतकरी तयार आहोत. तरी नगरपंचायत बैल बाजारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी ,अशी मागणी निवेदनात केली आहे.









