आंदोलकांना आवरण्यात हलगर्जीपणा
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंदोबस्तासाठी असणाऱ्या केएसआरपी पोलिसांकडून सेवा बजावताना हलगर्जीपणा केल्याने मार्केट पोलीस उपनिरीक्षकांकडून त्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक संघटनांकडून दररोज मोर्चे आणले जातात, आंदोलने केली जातात. त्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी याठिकाणी केएसआरपी पोलिसांची बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली आहे. सोमवारी दलित संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांना आंदोलन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी आंदोलन करण्यास भाग पाडले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसून आंदोलन करण्यास मज्जाव आहे. त्यामुळे याठिकाणी केएसआरपी पोलिसांची बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. असे असले तरी दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून नियोजित स्थळ वगळून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच आंदोलन केले गेले. त्यामुळे कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी असणारा मार्ग बंद झाला. परिणामी नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागले. नियोजित स्थळी आंदोलकांना आवरण्यात पोलिसांकडून हलगर्जीपणा करण्यात आल्याने हा प्रकार घडला. केएसआरपी जवानांनी तातडीने मोर्चेकऱ्यांना अडविण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली. तर काही पोलीस कर्मचारी बसमध्ये बसून होते. यावरून उपनिरीक्षकांनी केएसआरपी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ज्या कामासाठी आपली नेमणूक केली आहे, ते काम केले नाही तर काय उपयोग? असा सवाल करून यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे सांगून कार्यतत्पर राहण्याची सूचना केली.









