बेळगाव : समर्थ व्ही. बी., विनायक पांडे व माधव यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर हुबळी स्पोर्ट्स अ संघाने बलाढ्या बीडीके फौंडेशन अ संघाचा चार गड्यांनी पराभव करून केएससीए 19 वर्षाखालील चषक पटकावला. माधव डी. ला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर दीपक निरलगीने 5 गडी टिपले. हुबळी येथील केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए 19 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 35.4 षटकात सर्व गडीबाद 70 धावाच केल्या. त्यांच्या विराज हावेरी व सौरव सामंत यांनी प्रत्येकी 2 चौकारासह 12 तर दीपक निरलगीने 1 चौकारासह 11 धावा केल्या. या तिघांच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.
हुबळी स्पोर्ट्स क्लबतर्फे फिरकी गोलंदाज समर्थ व्ही. बी. व विनायक पांडे यांनी 11 धावात प्रत्येकी 3 तर माधव डी. ने 26 धावात 3 तर विकास पाटीलने एक गडी बाद केला. या तिघांच्या भेदक गोलंदाजीमुळे बीडीकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने 29.1 षटकात 6 गडी बाद 73 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात सुहास एम. ने 3 चौकारासह 19, शाहिद खतीबने 2 चौकारासह नाबाद 13, माधव डी. ने 2 चौकारासह 10 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्स क्लबची 5 गडी बाद 32 अशी नाजूक स्थिती असताना माधव डी. व शाहिद खदीबने डावाला सांभाळत विजयापर्यंत पोहोचविले. बीडीकेतर्फे दीपक निरलगीने 31 धावात 5 तर अथर्व नुलीने एक गडी बाद केला. सामन्यानंतर धारवाड विभागीय क्रिकेट पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाचा खास गौरव करण्यात आला. उपांत्य फेरीत हुबळी स्पोर्ट्स क्लबने आनंद क्रिकेट अकादमीचा एक धावेने तर बीडीके बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा 74 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.









