वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
भारताचा अष्टपैलू कृणाल पंडय़ाला दुखापत झाल्याने तो लवकरच मायदेशी परतणार आहे. इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत कृणाल पंडय़ा वॉर्विकशायर क्रिकेट कौंटीकडून वनडे चषक क्रिकेट स्पर्धेत खेळत होता.
इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेतील वनडे चषकमध्ये वॉर्विकशायर आणि नॉटिंगहॅमशायर यांच्यातील सामन्यात खेळताना कृणाल पंडय़ाला स्नायू दुखापत झाली. फलंदाजी करताना त्याला ही दुखापत झाल्याने तो दुसऱया डावात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरू शकला नाही. त्यानंतर रविवारी वॉर्विकशायर डरहॅम यांच्यातील सामन्यात तो उपलब्ध राहू शकला नाही. हा सामना वॉर्विकशायरने जिंकला होता. या दुखापतीनंतर कृणालने ब्रिटनमधील डॉक्टरांचा सल्ला घेतला. ही दुखापत बरी होण्यासाठी कृणालला किमान तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागेल. त्यामुळे तो आता मायदेशी परत येणार आहे. कृणालच्या जागी बदली खेळाडूबरोबर वॉर्विकशायरने करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. वनडे चषक क्रिकेट स्पर्धेतील उर्वरित सामन्यात वॉर्विकशायरला कृणाल पंडय़ाची उणीव निश्चितच जाणवेल, असे या कौंटीचे क्रिकेट संचालक पॉल फेरब्रेस यांनी सांगितले.
ब्रिटनमधील इंग्लिश कौंटी हंगामात वनडे चषक क्रिकेट स्पर्धेत कृणाल पंडय़ाने वॉर्विकशायर क्लबकडून खेळताना 5 सामन्यांतील 4 डावात 33.50 धावांच्या सरासरीने 134 धावा जमविल्या आहेत. या स्पर्धेत कृणालची 74 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. गोलंदाजीत कृणालने 5 सामन्यात 9 गडी बाद केले आहेत. 1 जुलै रोजी कृणालने वॉर्विशायर क्रिकेट क्लबशी करार केला होता. 2022 च्या रॉयल लंडन चषक क्रिकेट स्पर्धेसाठी हा करार झाला होता. 31 वर्षीय कृणालने 2021 साली इंग्लंडविरुद्ध आपले वनडे क्रिकेट पदार्पण केले असून त्याने पदार्पणातच 26 चेंडूत सर्वात जलद अर्धशतक नेंदविले होते. पंडय़ाने आतापर्यंत 5 वनडे आणि 19 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. गेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत तो लखनौ सुपरजायंट्स संघाकडून खेळला होता.









