रश्मिका मंदाना, शाहिद कपूरसोबत झळकणार
बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘कॉकटेल’चा सीक्वेल येणार आहे. 2012 मध्ये प्रदर्शित चित्रपटात दीपिका पदूकोन, सैफ अली खान आणि डायना पेंटी हे कलाकार दिसून आले होते. तर आता ‘कॉकटेल 2’ मध्ये नवे चेहरे दिसून येतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानिया करणार असून यात क्रीति मुख्य नायिका असणार आहे.
होमीने सोशल मीडियावर क्रीतिचे एक छायाचित्र शेअर करत त्यात ‘कॉकटेल 2’ चा हॅशटॅग यूज केला आहे. याचबरोबर त्याने वर्क इन प्रोग्रेस असे नमूद करत चित्रपटाची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. चित्रपटाच्या कहाणीवरून अत्यंत गोपनीयता बाळगली जात आहे. परंतु या चित्रपटात आधुनिक नातेसंबंध आणि आधुनिक प्रेमाच्या नव्या छटेला प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. चित्रपटात क्रीति सेनॉनसोबत शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असणार आहे. या तिघांची केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी एक नवा अनुभव ठरू शकते.
अलिकडेच रश्मिकाने दिग्दर्शक होमीच्या पोस्टला रीपोस्ट करत स्वत:चे मजेशीर छायाचित्र शेअर केले होते आणि त्यात ‘वर्क इन प्रोग्रेस’ असे लिहिले होते. क्रीति आणि शाहिद यापूर्वी ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात एकत्र दिसून आले होते. ‘कॉकटेल 2’ च्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा ही जोडी मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत केली जाणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.









