Sangli News : सांगली पाटबंधारे विभागामार्फत कृष्णा नदी मधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर दि. 14 ते 19 जून पर्यंत करण्यात आलेली उपसा बंदी पूर्ण शिथिल करण्यात आली. या योजनांचा विद्युत प्रवाह पूर्ववत करण्याच्या सुचना संबधित यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली आहे.
पाटबंधारे विभागाने कोयना आणि वारणा दोन्ही धरणात मृतसंचय साठ्या इतकेच पाणी शिल्लक राहण्याची आणि वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन अधिक होण्याची शक्यता गृहीत धरून 14 जून पासून उपसा बंदीचे आदेश दिले होते. तर पाच टीएमसी पर्यंत जरी कोयनेचे पाणी कमी झाले तरीही आवश्यक पाणीपुरवठा करता येऊ शकतो अशी संघटनांची भूमिका होती.
कोयना आणि वारणा धरणात पाणी उपलब्ध असताना आणि ते जुलै च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे संपूर्ण एक महिना वापरता येणे शक्य असताना पाटबंधारे विभागाने उपसा बंदी केली. असा आरोप करत याला कृष्णा महापूर विरोधी कृती समितीने आक्षेप घेतला होता. 1992 साली अशाच पद्धतीने लादलेली उपसा बंदी तत्कालीन राज्यपालांच्या आदेशाने मागे घेण्यात आली होती अशी आठवण करून देणारी तक्रार समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
नदीकाठच्या गावातून उपसा बंदीला विरोध तसेच पिकांचे नुकसान होणार असल्याची तक्रार होत होती. या तक्रारीमुळे हरिपूर ते म्हैसाळ बंधाऱ्यात पर्यंतची उपसाबंदी पाटबंधारे विभागाने रविवारी रद्द केली होती. त्यानंतर सोमवारी कराड ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या संपूर्ण क्षेत्रात ही बंदी मागे घेण्यात आली आहे.








