बेळगाव : शहर परिसरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमीनंतर शहराला वेध लागले होते ते श्रीकृष्ण जन्माष्टमीचे. यासाठी बाजारपेठेत श्रीकृष्ण व राधेच्या प्रतिमा विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. नागरिकांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमा घरी नेऊन त्यांची विधिवत पूजा केली. बेळगाव शहरात पारंपरिक पद्धतीने चव्हाट गल्ली, इस्कॉन मंदिर, गवळी गल्ली-टिळकवाडी येथे मोठ्या जल्लोषात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला. बुधवारी सकाळपासूनच जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. लाडूसोबत श्रीकृष्णासमोर दही, पोह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. याचबरोबर कृष्ण मंदिरांमध्ये भजन, कीर्तन व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या टिळकवाडी येथील मंदिरामध्ये फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. त्याचबरोबर विविध धार्मिक विधी करण्यात आले.
चव्हाट गल्ली येथील व्यंकटेश मंदिर कमिटीच्या सार्वजनिक श्री गोकुळाष्टमी उत्सव मंडळातर्फे पारंपरिक पद्धतीने गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. सायंकाळी 6 वाजता बापट गल्ली येथून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. व्यंकटेश मंदिरात श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर रात्री पूजा व भजन करण्यात आले. मध्यरात्री 12 वाजता जन्मोत्सव सोहळा पार पडला. गुरुवार दि. 7 रोजी सकाळी 11 वाजता लहान मुलांचा टिपऱ्यांचा नाच सादर केला जाणार आहे. या उत्सवाचे हे 94 वे वर्ष असून गुरुवारी दुपारी 1 वाजता दहीकाला होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.









