क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव येथील भरतेश हायस्कूलच्या सभागृहात आयोजित क्रीडा भारती उत्तर कर्नाटक राज्य महिला खेळाडूंचे सर्व्हेक्षण शिबिर मोठ्या उत्साहात पार पाडले.
भरतेश स्कूलच्या सभागृहात शिबिराचे उद्घाटन भरतेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजू दो•णावर यांनी दीपप्रज्वलन तसेच उपस्थित मान्यवरांनी भारतमाता व हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करून केले. यावेळेला महिला वर्गाला प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा भारतीचे अखिल भारतीय संघटक मंत्री प्रसाद महानकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अर्जुन प्रशस्ती विजेते मुकुंदजी किल्लेकर, कृष्णानंदजी भट, लक्ष्मण पवार, अशोक कोडगनूर, मेलेनकेरी, विश्वास पवार, नामदेव मिरजकर, छात्रतेज पराप्पा उपस्थित होते. सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरामध्ये विविध जिह्यातून आलेल्या 50 महिला व 20 पुरुषांनी भाग घेतला होता. महिला खेळाडूंच्या समस्या, खेळामधील प्रगती, मिळालेल्या सुविधा, त्यात असलेली कमतरता, खेळामुळे त्यांना मिळालेला लाभ, त्याला मिळत असलेले प्रशिक्षण, स्पर्धेला जाताना प्रवास व्यवस्था, खेळाडूंचा आहार, क्रीडा संस्थांकडून तसेच शाळा महाविद्यालयमधून मिळणारे प्रोत्साहन व इतर अनेक गोष्टी महिला खेळाडूंकडून माहिती करून घेण्यासाठी सर्व जिह्यांमधून महिलांची नेमणूक करून त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी हे शिबिर भरविण्यात आले होते. यावेळी क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, खेळाडू, प्रशिक्षक तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या महिला यांनी भाग घेतला होता.









