सुधाकर काशीद,कोल्हापूर
Kolhapur News : बुधवारी ऑगस्ट क्रांती दिन साजरा झाला.निवृत्ती आडुरकर यांच्या कार्याचा एकदिवसा पुरता बोलबाला झाला.कोल्हापुरातला निवृती चौक ज्याला म्हणतात तो चौक त्यांच्या नावाने आहे यासंबधी एखादं-दुसरा शब्द नव्या पिढीच्या कानावर पडला.स्वांतत्र्य चळवळीत निवृती जीवावर उदार झाले. देश स्वतंत्र झाल्यावर आपण कोणत्या तरी महामंडळावर, कमिटीवर जाऊ.., असला विचारही न करता स्वत:ला झोकून देऊन गेले.पारतंत्र्यावर खूप पोटतिडकीने बोलत राहिले.त्याचे फळ त्यांना काय मिळाले? स्वातंत्र्य चळवळीतील एका प्रकरणाचा तपास करताना त्यांची जीभ शब्दश:हासडली. हासडली म्हणजे काय केले? त्यांचा छळ करताना जीभेला दोरा बांधून ती बाहेर ताणवली.पण त्यांनी सगळं सहन केलं.जीभ लुळी पडल्याने त्यांना पुढे आयुष्यभर बोलताही आलं नाही. देश स्वतंत्र झाला.घरोघरी पेपर टाकून निवृतींचा उदरनिर्वाह सुरू राहिला.नाही म्हणायला त्यावेळच्या नगरपालिकेने त्यांचे नाव चौकाला दिले.निवृती चौक म्हणून सर्वांच्या तोंडात ते बसले.चौकातल्या शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याने चौकाची शान आणखीनच वाढली.पण या चौकाला ‘निवृती चौक’ का म्हणतात, हेच बहुतेकजण विसरले.कडक मावा मिळणारा चौक किंवा खवय्याचा चौक अशी त्याची ओळख झाली.विषापेक्षा वाईट मावा मळून त्याचा तोबरा भरण्यासाठी सकाळपासून थांबणारी तरुणांची झुंडच्या झुंड या चौकाने पाहिली.यात निवृती चौकाची मुळ ओळखच हरवली.
निवृती चौक म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा धगधगता इतिहास आहे.स्वातंत्र्य चळवळीनंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचीही या चौकाला किनार आहे. या चौकातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे त्याच्याकडे बघता क्षणी फुलणारी प्रेरणा आहे.अलीकडे सजावटीने तर चौक अधिकच सजला आहे.पण सजलेल्या या चौकात आता रोज डिजीटल फलकांची जणू स्पर्धाच आहे.कोणीही उठावे आणि पुतळ्यापेक्षा दुप्पट-चौपट मोठ्या आकाराचे डिजीटल तेथे झळकावे,ही पद्धतच पडली आहे.चौकाला ज्यांचे नाव आहे ते निवृती आडुरकर कोण? हे तर बहुतेकजण विसरलेच गेले आहेत.काहीजणांना हे चित्र अस्वस्थ करते.त्यांनी चौकात एका बाजूला सावित्रीबाई फुले व्यासपीठ उभे केले आहे.पण त्याचा वापरही क्वचित आहे.निवृती आडुरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालायचा,वंदन करायचे,हे देखील ठरून गेले आहे.कालही तसेच झाले.आता पुढे काही तरी करायची गरज आहे.नाही तर भविष्यात कोण हे निवृती ?… असे कोणी विचारले तर त्यात फारसे आश्चर्य नसणार आहे.
आम्हालाही दरवर्षी क्रांती दिन आला की चार-पाच दिवस आधी तुमची आठवण येते.पण निवृत्ती तुम्हीच काय? एकूणच देशासाठी घरावर तुळशीपत्र ठेवलेल्या खऱ्या स्वातंत्र्ययोद्ध्याबद्दल आम्हा पिढीला असलेली आस्था पाहता,आणि सुरू असलेला भ्रष्टाचार,टक्केवारी,तेढ,दादागिरी, दहशत,काळे धंदे, उघड घेतली जाणारी लाच,शिकूनही अनुभवावी लागणारी बेरोजगारी,दर पाच वर्षाला दाखवली जाणारी आमिषे पाहून निवृती, तुम्ही कशाला तुमचे आयुष्य धारातिर्थी वाहिले असे मनाला चाटून जाते..









