कोल्हापूर / सौरभ मुजुमदार :
महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे दख्खनचा राजा श्री जोतिबा. जोतिबा मूर्तीचा नुकताच बज्रलेप विधी पूर्ण झाला आहे. केदारनाथांच्या मूळ मूर्तीची महती वैविध्यपूर्ण अशीच आहे. याला विविध ग्रंथ, भुपाळी, आरती व पुरातन छायाचित्रांवरून पुष्टी मिळते. जोतिबाची क्रमणपद अर्थात एक पाऊल पुढे टाकून उभी असलेली आणि चतुर्भुज स्वरुपातील मूर्ती आहे. आजपासून जोतिबा खेट्यांना भक्तिमय वातावरणात प्रारंभ होत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेकविध ग्रंथांमधील मूर्तीविषयी असलेल्या उल्लेखाचा घेतलेला आढावा.
- श्री केदारनाथ कवच
पद्मपुराणातील करवीर खंडातील श्री केदारनाथ कवचमध्ये नाथांच्या या मूळ मूर्तीचे वर्णन आढळते. ‘केयुरादि विभूषितै: करतलै रत्नाकितै: सुंदरं नानाहारविचित्र पन्नगयुतैर्हैमांबरैर्मंडित:। हस्ताभ्या: ध्रृतखडगपात्र डमरूशुलं सदा बिभ्रतं वाजीवाहनदैत्यदर्पदलं केदारमीरां भजे ।। यामध्ये बाजूबंद, कंकण, रत्नमाला, यांसह नाग व सुवर्ण वस्त्र विविध हार, अलंकार धारण केलेल्या तसेच हातात खडग, डमरू, त्रिशूल, पानपात्र धारण केलेल्या अश्वावर स्वार असा शत्रूंचा संहार करणाऱ्या श्री केदार नाथाला नमन असो, असे म्हटले आहे. याच केदार कवचमध्ये देवांच्या मूर्तीचे सुंदर वर्णन असेही आढळते की, गळ्यात निळ्या रंगाची माळ व खांद्यावर रमणीय स्कंद घातलेला असून तो शस्त्रधारी लढवय्यांमध्ये सर्वोत्तम असून ज्याच्या हातामध्ये डमरू आहे.
- श्री केदार महात्म्य
श्री ज्योतिबा देवाचे पुजारी नाथदास कै. श्री संतराम रावजी बुणे वाडी–रत्नागिरीकर यांच्या अभ्यासातूनही ब्रम्हांड पुराणातील श्री केदार महात्म्य ग्रंथामधील माहिती समजते. या ग्रंथातेल श्री ऋषीवर्य जमदग्नी आणि ऋषीवर्य अगस्ती यांच्या संवादातून श्री केदार सहस्त्रनाम प्रगट झाले. या सहस्त्रनामामध्येच श्रींचा मूळ ध्यानमंत्र समाविष्ट आहे. ज्यामध्ये या मूर्तीचे वर्णन आढळते. ‘ध्याये देवं परेशं त्रिगुण गुणमयं, ज्योतिरूपं स्वरूपं वामेपात्रं, त्रिशूलं डमरूगसहितं खडगदशे विराजं।।’ भक्त अशा परब्रम्ह परमात्मास्वरूप परमेश्वर देवतेचे ध्यान करतात, हे दैवत ध्यानात सर्वश्रेष्ठ आहे आणि रज, तम, सत्व गुणांनी युक्त पण या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी युक्त सगुण स्वरूपात साकार होण्यासाठी ज्योती स्वरूपाच्या रूपात प्रकट झालेले असे श्री केदारनाथ अर्थात ज्योतिबा. ज्यांनी वरच्या डाव्या हातात त्रिशूल, खाली अमृतपात्र, उजव्या वरच्या हातात डमरू आणि खालच्या उजव्या हातात खडग अशी आयुधे धारण केलेली आहेत.
‘शेषारुढं सुरेशं क्रमणपदयुगं भक्त कारुण्य गम्यं सर्वांगे लिंगभूषं उपवितसहितं नाथ मार्गाधिपत्यं।।’ शेषावर आरुढ म्हणजेच विराजमान होऊन श्रीनाथ क्रमणपदामध्ये उभे राहून (म्हणजेच एक पाऊल पुढे टाकलेले) भक्तांवर करुणा करणाऱ्या श्री केदारनाथांच्या सर्वांगावर बारा ज्योतिर्लिंगे आहेत. बारा ज्योतिर्लिंगे भूषितांसह यज्ञोपवित (जानवे) देखील आहे. शेषावर आरुढ असल्यामुळे शेष हे विष्णूस्वरूप, तर हातामध्ये त्रिशूल धरल्यामुळे शिवस्वरूपांचे रूप, तर यज्ञोपवित, उपवित (जानवे) असल्यामुळे ब्रह्म स्वरूपांचे रूप आणि खडग हे शक्तीचे प्रतीक असे सर्वज्ञं त्रिदेवांत्मक स्वरूप व शक्ती तत्त्व ज्या ‘श्रीं’मध्ये समाविष्ट आहेत, असे श्री केदारनाथ अर्थात दख्खनचा राजा श्री ज्योतिबा होय.
अनेक भक्तांनी देखील लिखाणामध्ये देवांच्या मूर्तीचे वर्णन केलेले आहे. मध्येही त्याचा समावेश आहे. शेष आसन दक्षिणमुखी, खडग, त्रिशूळ, डमरू, पात्र सुखी क्रमण पदी कृपावलोकी संकटी धावे भक्तांच्या’ चिमण जोशी लिखित भूपाळीसह काही आरतींमध्येही देवांचे मूर्ती वर्णन आढळते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या आज्ञेवरून उत्तरेवरून दक्षिणेकडे उंच डोंगरावर भक्तांच्या रक्षणार्थ विराजमान झालेला दख्खनचा राजा श्री केदारनाथ आजही जगदंबेकडे तोंड करून एक पाऊल पुढे टाकून उभा आहे.
लक्षावधी भाविकांचे कुलदैवत असणारा देव ज्योतिबा कायमच अलंकारिक स्वरूपात दर्शन देत असतो. त्यामुळे अनेक भाविकांना देवाचे हे गर्भागारात विराजमान असलेले ग्रंथोक्त मूर्ती वर्णन ठाऊक नाही, पण देव केदाराचे संपूर्ण तत्त्व प्रकाशित करणारे हे स्वरूप सर्वांच्या अंत:करणात असणे गरजेचे आहे.
– अॅड. प्रसन्न मालेकर, मूर्तिशास्त्र अभ्यासक, कोल्हापूर








