सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरात पुन्हा कोयता गँगने उच्छाद मांडला असून शहरातील शेटे चौक तसेच पोलीस मुख्यालयानजिक या गँगने एकावर कोयता हल्ला तर दुसऱ्या एकाच्या डोक्यात फरशी घालून त्याला गंभीर जखमी केल्याने शहरात बुधवारी रात्री खळबळ माजली. दोन्ही जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून कोयता गँगचा शोध सुरू असून त्यातील एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत घटनास्थळ तसेच पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणे आठच्यासुमारास शहरातील गजबजलेल्या शेटे चौकातील एका दुकानाच्या समोर दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याची मल्हारपेठ येथील एका शिक्षकाशी बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हल्ल्यात झाले. या कोयता गँगने विनायक तपासे या शिक्षकाच्या हातावर कोयत्याने वार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली. त्यामुळे हल्लेखोरांनी पोवईनाक्याच्या दिशेने दुचाकीवरुन तिथून पळ काढला.
जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या नजिक पोहोचल्यानंतर त्यांना समोरुन एक ट्रक आडवा आला. यावेळी त्या ट्रकचालकाशी त्यांचे जोरात भांडण झाले. या भांडणात हल्लेखोरांनी अब्दुल इनामदार या ट्रकचालकाच्या डोक्यात फरशी घातली. परंतु सुदैवाने ती खांद्यावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटनेतील जखमी विनायक तपासे व अब्दुल इनामदार यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लाचे नेमके अद्यापही अस्पष्ट असून शहर पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत. हल्लेखोर चार ते पाच असल्याचे मानले जात असून त्यापैकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून शहर पोलिसांकडून त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
साताऱ्यातील वाढते हल्ले पोलिसांसाठी डोकेदुखीसाताऱ्यात महिन्याभरापूर्वीच पोवईनाका येथे टोळक्याकडून कोयते नाचवत दहशत माजवण्याचा प्रकार घडला होता. त्यापूर्वी ऐक्य कॉर्नर येथे युवकावर हल्ला, गोलबागे येथे झालेला बेछुट गोळीबार, वाहनांची खरेदी विक्री करणाऱ्या भोसले यांचा गोळीबारात मृत्यू अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न सातारकरांना पडला असताना पुन्हा बुधवारी झालेला कोयता हल्ला पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे.
शहरात राबवायला हवे सर्च ऑपरेशनवारंवार घडत असलेले कोयता हल्ले, हल्ल्यात अल्पवयीन मुलांचा समावेश, शहरात घडलेल्या गोळीबाराच्या घटना यासंदर्भात अनेकवेळा आवाज उठवण्यात आला आहे. परंतु या घटनांना अद्याप आळा बसला नाही. या घटना होऊच नये म्हणून डॅशिंग पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी रेकॉर्डवरील आणि संशयित अशा सर्व गुन्हेगारांच्या घराची झडती घेऊन घटना घडण्यापूर्वीच्या त्यांच्याकडील असणारे अग्गिशस्त्र, कोयते, पिस्टल, सुरे जप्त केल्यास अशा घटना रोखण्यास मदत होईल.