नवारस्ता :
गेल्या 24 तासांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाला सुरुवात झाली असल्याने कोयना पाणीसाठ्यात येणारी पाण्याची आवक वेगाने वाढू लागली आहे. पाणीसाठ्यात प्रतिसेकंद 25 हजार 279 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली असल्याने धरणातील पाणीसाठ्याने 80 टीएमसीचा टप्पा गाठला आहे. दरम्यान कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ 25 टीएमसी पाण्याची गरज आहे. कोयना पाणलोट क्षेत्रासाहित संपूर्ण पाटण तालुक्यात गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला असून पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक प्रतिसेकंद 25 हजार 279 क्युसेक झाली आहे. परिणामी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ सुरू झाली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत धरणाच्या पाणीसाठ्याने 80 टीएमसीचा टप्पा पार केला आहे.
गेल्या 24 तासांत कोयनानगर 87 (2663), महाबळेश्वर 145 (2832) आणि नवजा येथे 130 (2812) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
- धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता..!
दरम्यान, 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ 25 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र अद्यापही पावसाचे महिने बाकी असल्यामुळे सध्या तरी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करणे गरजेचे होणार आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रणासाठी कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता आहे.








