सिद्धरामय्या यांचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
प्रतिनिधी/ बेंगळूर
उत्तर कर्नाटक भागातील काही जिल्ह्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागात पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्रातील कोयना आणि उजनी जलाशयातून पाणी सोडावे, अशी विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सिद्धरामय्या यांनी यासंदर्भात शिंदे यांना पत्र पाठविले आहे.
उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, यादगिरी, रायचूर या जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कोयना जलाशयातून कृष्णा नदीपात्रात आणि उजनी जलाशयातून भीमा नदीपात्रात पाणी सोडावे. राज्यात मान्सूनपूर्व पाऊस होत असला तरी नद्यांमध्ये वाहून येईल, इतका पाणीसाठा झालेला नाही. उन्हाची तीव्रताही वाढली आहे. अशा परिस्थितीमुळे सध्या पडणाऱ्या पावसाचे पाणी कोठेही उपयोगाला येत नाही, असा उल्लेखही पत्रामध्ये करण्यात आला आहे.
उत्तर कर्नाटकात पाण्याची समस्या गंभीर आहे. नैर्त्रुत्य मान्सून प्रारंभ होण्यास बराच वेळ आहे. या पार्श्वभूमीवर कोयना जलाशयातून दोन टीएमसी आणि उजनी जलाशयातून 3 टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती सिद्धरामय्यांनी केली आहे.
उन्हाळ्याच्या प्रारंभी कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून कोयनेतून 3 टीएमसी आणि उजनीमधून 3 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली होती. या विनंतीची दखल घेत नागरिकांना आणि जनावरांना पिण्यासाठी 1 टीएमसी पाणी कृष्णा नदीपात्रात सोडण्यात आले होते. त्याबद्दल सिद्धरामय्या यांनी कृतज्ञताही व्यक्त केली आहे.









