विटा प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील दिवसेंदिवस होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी आग्रही मागणी होत होती. यातूनच पाण्यावरून सांगली आणि सातारा असा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्यावर आमदार अनिल बाबर यांच्या शिष्टाईनंतर तात्पुरता तोडगा काढण्यात यश आले आहे. कोयना धरणातून तातडीने एक टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्याला सध्या तरी पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळणार आहे.
पावसाचा अभाव आणि धरणातून पाणी सोडण्यास कमी साठ्यामुळे असलेल्या मर्यादा लक्षात घेता जिल्ह्यात अभूतपूर्वक पाणीटंचाईला सामोरे जाण्याची लक्षणे आहेत. पिण्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी जिल्हाभरातून होत असताना सातारा आणि सांगली असा पाण्यासाठी संघर्ष असल्याचे चित्र उभा रहाते की काय? अशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाची आणि पाटबंधारे विभागाची दमछाक सुरू झाली आहे.
यावर्षी पावसाने ओढ दिल्याने कशी तरी सरासरी गाठली आहे. सहाजिकच भीज पाऊस न झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. सातारा जिल्ह्यात झालेल्या पावसाने कोयना धरणात ८९.७ टीएमसी पाणीसाठा असला तरी प्रत्यक्षात जिवंत पाणीसाठा ८३.९४ टीएमसी इतका आहे. पुढच्या जुलै पर्यंत हे पाणी पुरवण्याचे पाटबंधारे समोर आव्हान आहे. ऑक्टोबरच्या वाढत्या उष्णतेमुळे सिंचनासाठीच्या पाण्याची मागणी वाढत आहे.
महत्त्वाची सर्व धरणे सातारा जिल्ह्यात असल्यामुळे पाणी सोडण्याच्या बाबतीत कालवा समितीची सातारा जिल्ह्याची बैठक महत्त्वाची आहे. सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीतील धोरणावर सांगली जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती अवलंबून असणार आहे. तारळी आणि चांग धरणातील पाणी साधारणपणे डिसेंबर पर्यंतच असते. हे पाणी वाया जाण्यापेक्षा सांगली जिल्ह्याला द्यावे, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी केली होती. शिवाय कोयना धरणातील पाणी विजेसाठी अधिक वापरले जाते. यावर्षी पाणी टंचाई लक्षात घेता, विजेसाठी पाण्याचा वापर कमी करावा. विजेला पर्याय शोधता येतील, मात्र पिण्याच्या पाण्याला काय पर्याय शोधणार? असा सवाल करीत विजेसाठी पाणी कमी करून पिण्यासाठी पाणीसाठा राखिव ठेवावा, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी कालवा समिती बैठकीत केली आहे. आगामी उन्हाळ्याच्या तिव्र झळा लक्षात घेऊन दूरदृष्टीने धोरण राबवण्याची गरज आहे, असे आमदार बाबर यांनी म्हंटले होते.
आमदार अनिल बाबर यांची यशस्वी शिष्टाई
या पार्श्वभूमीवर सातारा आणि सांगली असा होणारा सांभाव्य पाणी संघर्ष टाळण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी शिष्ठाई केली आहे. त्यांनी सातारचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराजे देसाई यांच्याशी संपर्क करून सांगली जिल्ह्यातील पाणी टंचाईची परिस्थिती सांगीतली. सांगली जिल्ह्यासाठी तातडीने पाणी देण्याची गरज असल्याचे सांगत त्यानी पाणी सोडण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रशासनाला तात्काळ सुचना करीत एक टीएमसी पाणी कोयना धरणातून सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी सांगली जिल्ह्यात असणारी पाणी टंचाईची झळ कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय सांभाव्य संघर्षावर चर्चेतून तोडगा काढून जनतेला दिलासा देणे महत्त्वाचे आहे, असे आमदार अनिल बाबर यांनी म्हंटले आहे.