ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे-कोल्हापूर दुहेरी रेल्वेमार्गावरील एका बाजूचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात मुंबई-कोल्हापूर धावणारी कोयना एक्स्प्रेस पुणे ते कोल्हापूरदरम्यान पहिल्यांदाच विद्युत इंजिनवर धावणार आहे. या एक्स्प्रेसला आता पुणे स्थानकांवर डिझेल इंजिन जोडावे लागणार नाही.
कोल्हापूर-पुणे पूर्वी एक रेल्वेमार्ग होता. आता त्याचे दुहेरीकरण करण्यात आले असून, जुन्या मार्गावरचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालं आहे. नवीन रेल्वेमार्गावरचं काम पूर्णत्वास येत आहे. कोल्हापूर स्थानकातील विद्युतीकरणाचे काम अद्याप बाकी आहे. म्हणून येत्या दोन-तीन दिवसात कोयना एक्स्प्रेस प्रायोगिक तत्वावर विद्युत इंजिनवर मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास पूर्ण करेल. दोन्ही मार्गावरचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर महालक्ष्मी एक्सप्रेसही या मार्गावरुन धावणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात कोयना एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.