नवारस्ता
मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही कोयना पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण पाटण तालुक्यात दिवसभर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवकही कमी झाली. मात्र तरीही धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटांवर स्थिर ठेवण्यात आले. त्यामुळे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद २१ हजार ८२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.
कोयना पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण पाटण तालुक्याला गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली. परिणामी पाणीसाठ्याने निर्धारित पाणीपातळी ओलांडल्याने धरणाच्या सहा वक्र दरवाजे प्रारंभी चार फूट, नंतर साडेसहा फूट उचलून धरणातून प्रतिसेकंद ३१ हजार क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. परिणामी कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन नदीवरील निसरे फरशी, जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला होता, तर मुळगाव पुलालाही पाणी टेकले होते.
सोमवारपासून पाणलोट क्षेत्रासह तालुक्यातील पावसाचा जोर कमी झाला. तो मंगळवारीही कमी राहिला. त्यामुळे सोमवारी चार फुटांवर ठेवण्यात आलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे मंगळवारीही स्थिर ठेवण्यात आले. प्रतिसेकंद १९ हजार ७२४ आणि पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक असे मिळून एकूण २१ हजार ८२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोयना ९ (२९८९) मिलिमीटर, महाबळेश्वर १२ (३३८३) तर नवजा येथे ३० (३२६५) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रतिसेकंद २६ हजार ४२३ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा ८५.८१ टीएमसी झाला आहे.








