नवारस्ता :
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी बुधवारी धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांवरून साडेतीन फुटांवर उचलण्यात आले. परिणामी दरवाजामधून प्रतिसेकंद 9300 आणि पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक असे मिळून कोयना नदीपात्रात एकूण 11 हजार 400 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे आणि धरणाच्या पाणीसाठ्याने निर्धारित पाणीपातळी ओलांडल्यामुळे मंगळवारपासून धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद पाच हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र मंगळवारी रात्रीपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वेगाने वाढ सुरू झाली. परिणामी पाणीपातळी नियंत्रणासाठी बुधवारी दुपारी 12 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावरून साडेतीन फूट उघडून 9300 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
या विसर्गामुळे आणि पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोयना आणि कृष्णाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन कोयना सिंचन विभागाच्या वतीने केले आहे.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणात प्रतिसेकंद 17 हजार 906 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा 77.40 टीएमसीवर पोहोचला आहे.








