नवारस्ता :
गेल्या २४ तासांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवकही कमी झाली. त्यामुळे साडेसहा फुटांवर उचललेले कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सोमवारी दीड फुटांनी कमी करून सायंकाळी ते चार फुटांवर ठेवण्यात आले. त्यामुळे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद २१ हजार ८२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.
कोयना पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण पाटण तालुक्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढण्यास सुरुवात केली आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाल्याने पाणीसाठ्याने निर्धारित पाणीपातळी ओलांडल्याने धरणाच्या सहा वक्र दरवाजे प्रारंभी चार फूट व नंतर साडेसहा फूट उचलून धरणातून प्रतिसेकंद ३१ हजार क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. परिणामी कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन नदीवरील निसरे फरशी, जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला होता, तर मुळगाव पुलालाही पाणी टेकले होते.
मात्र सोमवारी दिवसभर पाणलोट क्षेत्रासह तालुक्यातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी कमी करून ते चार फुटांवर ठेवण्याचा निर्णय कोयना सिंचन विभागाच्या वतीने घेण्यात आला. परिणामी सहा वक्र दरवाजामधून प्रतिसेकंद १९ हजार ७२४ आणि पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक असे मिळून एकूण २१ हजार ८२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोयना १४, महाबळेश्वर १५ तर नवजा येथे १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा ८५.४४ टीएमसी इतका झाला आहे.
- मुळगाव पूल वाहतुकीस बंदच
सोमवारी मुळगाव पुलावरील पाणी कमी झाले आहे. मात्र अद्याप पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने नदीपलीकडील गावांचा पाटणशी संपर्क तुटलेलाच आहे. त्या भागातील वाहतूक बेलवडे, नवारस्ता मार्गे वळविण्यात आली आहे.








