नवारस्ता :
कोयना धरणाचे सलग आठ दिवस सुरू असणारे सहा वक्र दरवाजे अखेर शुक्रवारी रात्री आठ वाजता पूर्णपणे बंद केले असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली. दरम्यान, धरणाचे पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरुच असून त्यामधून कोयना नदीपात्रात केवळ 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचेही विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
कोयना पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण पाटण तालुक्यात मुसळधार पावसाने सलग आठ दिवस अक्षरश: धुमाकूळ घातला. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तब्बल 13 फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू राहिला. परिणामी कोयना नदीवरील निसरे, मुळगाव, नेरळे या मोठ्या पुलांसह लहान-मोठे बहुतांशी पूल तब्बल 24 तास पुराच्या पाण्याखाली गेले. परिणामी नदीपलीकडच्या गावांचा संपर्क तुटला. एवढेच नव्हे, तर कोयना नदीने रौद्र रुप धारण केल्यामुळे हेळवाक रस्त्यावर महापुराचे पाणी आल्याने कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
मंगळवारपर्यंत तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने बुधवारपासून ओसरायला सुरुवात केली. त्यामुळे 13 फुटांवर उचललेले धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन-दोन फुटांनी कमी करण्यात आले. शुक्रवारी पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात दिवसभर पावसाने उसंतच दिली. त्यामुळे रात्री आठ वाजता धरणाचे सर्व दरवाजे आणि दरवाजामधून सुरू असलेला विसर्ग बंद केल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.
- धरणात 98.89 टीएमसी पाणीसाठा
शुक्रवारी सायंकाळ पाचपर्यंत कोयना 4 (4025) मिलिमीटर, महाबळेश्वर (4932) तर नवजा येथे 2 (4655) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात 21 हजार 395 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा 98.89 टीएमसी झाला आहे.
- पाण्याखाली गेलेले सर्व पूल खुले
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून सुरू केलेला प्रचंड विसर्ग यामुळे कोयना नदीवरील मुळगाव, नेरळे, निसरे, जुना धक्का पूल, निसरे फरशी हे सर्व पूल पाण्याखाली गेले होते. मात्र गुरुवारपासून पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणाची सर्व दारे बंद करून विसर्गही बंद केल्याने कोयना नदीवरील पाण्याखाली गेलेले सर्व पूल शुक्रवारी खुले झाले.








