विनोद सावंत, कोल्हापूर
Kotitirtha lake Kolhapur News : महापालिकेने अडीच कोटींच्या निधीतून कोटीतीर्थ तलावाचे संवर्धन आणि सुशोभिकरणाचे सुरू केलेले काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान,गाळमुक्तीनंतर प्रथमच तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावातील पाणी स्वच्छ असून तलावाने गतवैभव प्राप्त केले आहे. परतुं येथून पुढे तलावाचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी तो प्रदूषणमुक्त राहण्यासाठी महापालिकेसह नागरीकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
शहरातील रंकाळा, कोटीतीर्थ तलाव हे पारंपरिक जलस्त्रोत असून यांना ऐतिहासिक महत्व आहे. त्यांचे संवर्धन,जतनाची जबाबदारी महापालिकेची आहे.गेल्या काही वर्षापासून कोटीतीर्थ तलावाची दुरवस्था झाली आहे.तलावातील पाणी प्रदूषित झाले होते. परिसरातील सांडपाणी तलावात मिसळत असल्याने जलचर धोक्यात आले होते.राज्य शासनाने रंकाळा तलावासाठी 9 कोटींचा निधी दिला आहे.मात्र, कोटीतीर्थ तलाव सुशोभिकरण,संवर्धन प्रलंबित होते.महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कोटीतीर्थ तलाव जलपर्णीने भरला होता. मासे, कासव मृत्यूचे प्रमाण वाढल्याने विविध पक्ष,सामाजिक संघटनांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.त्यामुळे महापालिकेने कोटीतीर्थ तलावाचे स्वनिधीतून संवर्धन,सुशोभिकरणाचा निर्णय घेतला.बजेटमध्ये 2 कोटींची तरतूद करून ठेकेदारामार्फत काम सुरू केले.
पहिल्या टप्प्यामध्ये तलावातील जलपर्णी हटवण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.तलावातून 300 डंपर गाळ काढला आहे.तिसऱ्या टप्प्यात तलावाच्या बाजूने दगडी पिचिंग केले जात आहे.तलावात आयलँड उभारला जात आहे.कोटीतीर्थ तलावात दुर्मीळ पक्ष्यांचा अधिवास असतो.त्यांच्यासाठी आयलँडची सोय केली आहे.त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांनाही हे पक्षी जवळून पाहता येणार आहेत.
दरम्यान,गाळ काढताना तलावातील अस्वच्छ पाणी बाहेर काढले.जलचरांना धोका होऊ नये म्हणून दोन टप्प्यात काम पूर्ण केले.शहरात गेल्या सप्ताहभरात झालेल्या पावसामुळे तलाव प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे.तलावातील पाणी स्वच्छ दिसत असून हीच स्थिती येथून पुढेही कायम राहिली पाहिजे.तलावात मूर्ती विसर्जन अथवा परिसरातील सांडपाणी मिसळणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे अन्यथा आतापर्यंत तलावासाठी खर्च केलेले अडीच कोटे पाण्यात जाण्याचा धोका आहे.
कोटीतीर्थ तलावासाठी निधी – 2 कोटी 50 लाख
ठेकेदार कंपनी – नलगे असोसिएटस्
कामाची मुदत – ऑगस्ट 2023 पर्यंत
तलावात आतापर्यंत झालेली कामे
तलावातील जलपर्णी हटवली
300 डंपर गाळ काढला.
दगडी पिचिंगचे काम पूर्ण
आयलँडचे काम अंतिम टप्प्यात
सर्व कामे पूर्ण, केवळ तारेचे कंपाऊंड, कारंजा बाकी
कोटीतीर्थ तलावातील जलपर्णी हटवली आहे. गाळ काढून दगडी पिचिंग पूर्ण केले असून आयलँडही उभारला आहे. आता केवळ तारेचे कंपाऊंड, कारंजा करण्याचे काम बाकी आहे. किरकोळ कामे बाकी असून पुढील आठ दिवसांत पूर्ण होतील.
अवि कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख, नलगे असोसिएटस









