ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते बेताल वक्तव्य करत आहेत. मंत्री गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तर यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केली होती. तर भारत जोडो यात्रेत काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर 9swatantryaveer savarkar) ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असं विधान केलं. त्यावरून राज्यात राहुल गांधींचा निषेध केला जात असताना प्रत्युत्तरादाखल सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी “एका महिलेसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असं म्हंटल आहे. त्यामुळे त्या विधानावरूनही राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मराठवाडा विद्यापीठाच्या (Marathwada University) दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. तुमचे हिरो तुम्हाला इथेच मिळतील. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. डॉ. आंबेडकरांपासून ते पवार – डॉ. गडकरींपर्यंत हेच सध्याचे आदर्श आहेत, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो. तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आदर्श कोण असे विचारले जायचे. त्यावेळी कुणी सुभाषचंद्र बोस तर कोणी नेहरू, तर कोणी गांधी सांगायचे. आता नव्या युगाचे मी सांगतो आहे. तुम्हाला दुसरीकडे शोधायची गरज नाही. याच महाराष्ट्रात तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते डॉ. नितीन गडकरी हे आदर्श आहेत. असे म्हणत त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांची तुलनाही केली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कोणी तुमचे आदर्श विचारले तर तुम्ही नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे नाव घ्या. तेच नव्या युगाचे शिवाजी महाराज आहेत. शिवाजी तो अब पुराने युग की बात हो गयी है..!, असेही त्यांनी म्हटले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, मागच्याच वर्षी या दोघांनाही माझ्या हस्ते मानद पदवी देण्यात आली. आता पुन्हा या दोघांना माझ्या हस्ते डिलीट दिली गेली. आणखी दोन ते तीन विद्यापीठांची डिलीट यांना देणे बाकी आहे. तेथील कुलगुरूंना मी म्हणतो तुम्हाला दुसरे कोणी सापडत नाहीत का.? तर ते म्हणतात हेच आमचे आयडॉल आहेत. यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांनाच डिलीट द्यायची आहे. म्हणून माझाही नाईलाज होतो.