कोल्हापूर :
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत मुरलधीर कोटरकर यानेच इंद्रजित सावंत यांना मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास फोन केला. याबाबतचे पुरावे प्राथमिक तपासात समोर आले आहेत असा युक्तीवाद मंगळवारी सकाळी सरकारी वकील सुर्यकांत पवार आणि अॅङ आसिम सरोदे यांनी न्यायालयात केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन चौथे दिवाणी सहकनिष्ठ न्यायाधीश एस. एस. तट यांनी कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
गेल्या महिन्यापासून पसार असलेल्या प्रशांत कोरटकर याला सोमवारी दुपारी तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथून अटक करण्यात आली. मंगळवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये कोरटकरला न्यायालयात हजर केले. न्यायाधीश एस. एस. तट यांच्यासमोर दुपारी सव्वाबाराच्या सुमारास सुनावणीस सुरुवात झाली. तपास अधिकारी संतोष गळवे यांनी सुरुवातीला आरोपीच्या अटकेची माहिती देऊन, पोलिस कोठडीच्या कारणांची मांडणी केली. आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी त्यांनी केली. सरकारी वकील सुर्यकांत पवार यांनी कोरटकरने कोणाच्या सांगण्यावरून मोबाइलमधील डेटा नष्ट केला? त्यावेळी त्याच्यासोबत कोण होते? पसार काळात त्याला कोणी मदत केली? पळून जाण्यासाठी कोणती वाहने वापरली? जातीय भावना भडकवण्यामागील त्याचा उद्देश काय? याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी गरज असल्याचे सांगितले. कोरटकरवर दाखल असलेल्या कलमांनुसार सात वर्षाच्या आतील शिक्षेची तरतूद असली तरी गुह्यांचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी असा युक्तीवाद केला. यानंतर इंद्रजित सावंत यांचे वकील अॅड. असिम सरोदे यांनी पुढील तपासासाठी कोरटकरसह पाच जणांच्या आवाजाचे नमुने घ्यावे लागतील. महिनाभर पसार काळात तो अनेक ठिकाणी फिरला. त्या ठिकाणी जाऊन तपास करावा लागेल. महाराष्ट्रद्रोही वक्तव्ये करून त्याने राजमाता जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत. याबाबत त्याला कोणाची फूस होती काय? याचाही तपास करावा लागेल. त्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी अशी विनंती न्यायालयाला केली.
संशयित कोरटकर याच्या वतीने अॅड. सौरभ घाग यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात युक्तीवाद केला. पोलिसांनी केलेली अटकच बेकायदेशीर असल्याचा आरोप करत, कोरटकरचे मोबाईल आणि पासपोर्ट पोलिसांकडे आहेत. तसेच यापूर्वी कोरटकरने न्यायालयात अर्ज करुन आवाजाचे नमुने घेण्याची मागणी केली होती. यामुळे पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तीवाद केला. दोनही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर चौथे दिवाणी सहकनिष्ठ न्यायाधीश एस. एस. तट यांनी कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यावेळी न्यायालयात अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, शहर पोलीस उपअधिक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपस्थित होते.
- अटक बेकायदेशीर
भारतीय न्याय संहिता कलम 35-3 नुसार कोरटकर यांना पोलिसांनी नोटीस पाठवली नाही. त्यांच्यावर दाखल असलेल्या गुह्यात सात वर्षाच्या आतील शिक्षेची तरतूद आहे. पोलीसांनी कोरटकर यांना केलेली अटक बेकायदेशी असल्याचा युक्तीवाद अॅङ सौरभ घाग यांनी केला.
- चंद्रपुर पोलीस मुख्यालयासमोर कोरटकरचा मुक्काम
प्रशांत कोरटकर हा आपल्या गावापासून 350 किलोमीटर दुर गेला होता. या काळात तो कोठे कोठे राहिला याचा तपास करण्यासाठी पोलिसांना वेळ लागणार आहे. यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. तसेच कोरटकर हा दोन दिवस चंद्रपुर येथील पोलीस मुख्यालयासमोरील लॉजवर वास्तव्यास होता. चंद्रपुर पोलीस मुख्यालयातील सिसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावे अशी मागणीही अॅङ असिम सरोदे यांनी केली. तसेच पोलिसांवर राजकीय दबाव असून, दबाव नसल्यास एका दिवसात पोलीस तपास करतील असा युक्तीवाद सरोदे यांनी केला.
- आवाजाची पडताळणी होणार
इंद्रजित सावंत यांना फोन केल्याचे प्राथमिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र आता कोरटकरच्या आवाजाचे नमुने शास्त्राrय आणि वैज्ञानिक पद्धतीने घेणे आवश्यक आहे. यासाठी पाच जणांच्या आवाजाचे नमुने घेण्यात येणार आहे. कोरटकरने केलेल्या फोनमधील संपूर्ण स्क्रिप्ट त्याच्याकडून वाचून घेवूनच हे नमुने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आवाजाचे नमुने पडताळणी करण्यासाठी आजच परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. यास न्यायाधीशांनी परवानगी दिली.








