वृत्तसंस्था/ खोया याई (थायलंड)
आगामी होणाऱ्या एएफसी 17 वर्षाखालील वयोगटाच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी प्रमुख प्रशिक्षक बिबियानो फर्नांडिस यांनी मंगळवारी भारतीय फुटबॉल संघाची घोषणा केली असून कोरोयु सिंग थिंगुजम याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भातीय युवा फुटबॉल संघामध्ये 16 वर्षीय कोरोयु सिंग हा मधल्या फळीतील आक्रमक फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्याची कामगिरी दर्जेदार झाल्याने आता त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या भारताचा 17 वर्षाखालील फुटबॉल संघ थायलंडमध्ये वास्तव्य करीत असून त्यांच्यासाठी खास प्रशिक्षण सराव शिबिर आयोजित केले आहे. 14 जुन रोजी भारतीय युवा फुटबॉल संघ थायलंडच्या राजधानीत दाखल होणार आहे. एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारताचा पहिला सामना 17 जूनला व्हिएतनामबरोबर, दुसरा सामना 20 जूनला उझ्बेकबरोबर तर तिसरा सामना 23 जूनला जपानबरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारताचा ड गटात समावेश आहे.









