वृत्तसंस्था/ सोल
दक्षिण कोरियाच्या घटनात्मक न्यायालयाने पंतप्रधान हान डक-सू यांच्या विरोधातील महाभियोग फेटाळण्याचा आणि त्यांचे अधिकार पुन्हा प्रदान करण्याचा निर्णय दिला आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापूर्वी काळजीवाहू अध्यक्षाच्या स्वरुपात त्यांच्या महाभियोगानंतर देशाच्या राजकीय उलथापालथीला यामुळे नवे वळण मिळाले आहे.
हान यांनी अध्यक्ष यून सूक येओल यांचे स्थान घेत काळजीवाहू अध्यक्षाचा पदभार स्वीकारला होता. पंतप्रधान हान दोन आठवड्यांपेक्षा कमी काळापर्यंत पदावर राहिले आणि 27 डिसेंबर रोजी घटनात्मक न्यायालयात आणखी तीन न्यायाधीशांच्या नियुक्तीस नकार दिल्यावर विरोधी पक्षाने त्यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडला होता. घटनात्मक न्यायालयाने महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळण्यासाठी 7 विरुद्ध एक अशा बहुमताने निर्णय दिला आहे.
75 वर्षीय हान यांनी रुढिवादी आणि उदारमतवादी दोन्ही प्रकारच्या 5 अध्यक्षांच्या अधीन तीन दशकांपेक्षा अधिक काळापर्यंत नेतृत्वाच्या पदांवर काम केले होते. तरीही विरोधी पक्षांचे बहुमत असलेल्या संसदने त्यांच्यावर मार्शल लॉ घोषित करण्याच्या यू यांच्या निर्णयाला रोखण्यासाठी पुरेशी पावले न उचलल्याचा आरोप केला होता.









