प्रणॉय, आयुश शेट्टी यांच्या कामगिरीवर लक्ष्य
वृत्तसंस्था / सुओन (कोरिया)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या कोरिया खुल्या सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. 475,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत भारताचे आव्हान प्रणॉय आणि आयुष शेट्टी यांच्या कामगिरीवर अवलंबून राहील.
भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी अलिकडेच झालेल्या हाँगकाँग आणि चायना मास्टर्स आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष दुहेरीत अंतिम फेरी गाठली होती. पण या स्पर्धेसाठी त्यांनी विश्रांती घेतली असल्याने आता भारताचे यश प्रणॉय आणि आयुष यांच्या कामगिरीवर अवलंबून राहील. 2023 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या प्रणॉयला चालु वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. प्रणॉयने विविध स्पर्धांमध्ये चीनच्या लु झूवर विजय मिळविला आहे. पण त्याला लक्ष सेन आणि अॅन्टोन सेनकडून पराभवही पत्करावा लागला आहे. 33 वर्षीय प्रणॉयचा या स्पर्धेतील सलामीचा सामना पात्र फेरीतील खेळाडूबरोबर होईल. तर दुसऱ्या सामन्यात त्याची गाठ चीन तैपेईच्या चोयु चेन बरोबर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आयुष शेट्टीने 2025 च्या बॅडमिंटन हंगामात बीडब्ल्यूएफ स्पर्धेतील एकमेव विजेतेपद मिळविले आहे. तसेच त्याने अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले आहे. मंगळूरच्या 22 वर्षीय आयुष शेट्टीचा कोरिया बॅडमिंटन स्पर्धेतील सलामीचा सामना चीन तैपेईच्या यांग बरोबर होईल. आयुष शेट्टीने यापूर्वी विविध स्पर्धांमध्ये जपानच्या नाराओका, चोयु चेन, कॅनडाचा ब्रायन यांग आणि डेन्मार्कच्या रेसमुस गिमेकी यांना पराभूत केले आहे. भारतीय संघातील आणखी एक बॅडमिंटनपटू किरण जॉर्ज याचा सलामीचा सामना सिंगापूरच्या लोह येवशी होणार आहे. महिलांच्या एकेरीत अनुपमा उपाध्यायचा सलामीचा सामना इंडोनेशियाच्या पुत्री कुसूमा वेरदाणीशी होईल. मिश्र दुहेरीत मोहीत जगलन आणि लक्षिता जगलन यांचा सलामीचा सामना जपानच्या शिमोगेमी आणि पोबारा यांच्याशी होईल.









