कोल्हापूर :
अंतरिम जामिन फेटाळल्यानंतर पसार होण्यासाठी प्रशांत कोरटकरने स्वत:ची अलिशान मर्सिडीज गाडी वापरली होती. नागपूर ते चंद्रपुर असा प्रवास या वाहनातून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने शनिवारी सकाळी ही अलिशान गाडी जप्त केली असून, कोल्हापूर पोलिसांचे पथक ही गाडी घेवून येत आहे. दरम्यान 18 मार्च ते 24 मार्च दरम्यान कोरटकरने 1 लाख 50 हजार रुपये खर्च केले असून, त्याला ही आर्थिक रसद कोणी पुरविली यांचा शोध पोलीस घेत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीमध्य दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पसार काळात त्याला मदत करणाऱ्यांची नावे समोर आली असून, लवकरच त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. दरम्यान रविवारी सकाळी त्याची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
- आठ दिवसांत दिड लाख रुपये उडवले
कोरटकरने 17 मार्च पासून 24 मार्च पर्यंत आठ दिवसांमध्ये जवळपास दिड लाख रुपये खर्च केले आहेत. हे पैसे त्याला कोणी पुरविले याचा शोध पोलीस घेत आहेत. हे पैसे त्याच्यापर्यंत कसे पोहचविण्यात आले आहेत. याचा शोध पोलीस घेत आहेत.
- कोरटकरची अलिशान कार जप्त
दरम्यान कोरटकर याने पसार होण्यासाठी चार वाहनांचा वापर केल्याची माहिती समोर आली होती. यापैकी दोन वाहने पोलीसांनी जप्त केली आहेत, तर दोन वाहनांचा शोध सुरु आहे. कोरटकरने नागपूर येथून चंद्रपुर पर्यंत स्वत:ची अलिशान मर्सिडीज कार वापरली होती. यानंतर अटकेच्या भितीने त्यानेही गाडी एका मित्राकडे सोडून पळ काढला होता. ही कार पोलिसांनी जप्त केली असून, रविवारी सकाळी ती कोल्हापूरात आणण्यात येणार आहे.
- धीरज चौधरीची सोमवारी चौकशी शक्य
प्रशांत कोरटकर याने प्रशिक पडवेकर (नागपूर), धीरज चौधरी (चंद्रपुर), राजेंद्र जोशी (इंदोर), साईराज पेटकर (करीमनगर), हिफाजत अली (इंदोर) या पाच जणांनी आपल्याला मदत केल्याचे कबूल केले आहे. यानुसार या पाचही जणांना पोलिसांनी नोटीस पाठविल्या आहेत. कोरटकरला पसार होण्यासाठी धीरज चौधरी याने मोटार आणि काही पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार सोमवारी धीरज चौधरीला चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.
- धीरज चौधरीची मोटार कोल्हापूरात
महाराष्ट्र आणि तेलंगणा बॉर्डरवरुन शुक्रवारी रात्री धीरज चौधरी यांची मोटार पोलिसांनी ताब्यात घेतली होती. ही पांढऱ्या रंगाची एसयुव्ही 700 (एमएच 32 सिडी 7720) या नंबरची मोटार घेवून कोल्हापूर पोलिसांचे एक पथक कोल्हापूरात दाखल झाले. प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी या गाडिचे शुटींग केले. यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून ही गाडी पंचनामा करुन अज्ञात स्थळी ठेवली.
- 18 ठिकाणचे सिसीटीव्ही फुटेज ताब्यात
कोरटकरने पसार काळात सिकंदराबाद, हैद्राबाद, चंद्रपुर, बैतुल, इंदोर, तेलंगणा या ठिकाणी प्रवास केला आहे. या ठिकाणी तो आठ ते दहा हॉटेलमध्ये राहिला आहे. या ठिकाणचे सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे एक पथक नागपूर आणि तेलंगणा येथे गेले होते. या पथकाने 18 ठिकाणचे सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तसेच काही जणांना फुटेज देण्यासाठी नोटीस दिल्या आहेत.
- आज न्यायालयात हजर करणार
प्रशांत कोरटकर याला शुक्रवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. रविवारी ही पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गत दोन वेळा झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.








