कोल्हापूर :
प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार होण्यासाठी प्रशिक पडवेकर, बुकी मालक धीरज चौधरी, राजेंद्र जोशी, राजू पेटकर, हिफाजत अली यांनी मदत केली आहे. यापैकी धीरज चौधरी हा मटका बुकी असून त्याच्या मोटारीतून पलायन केल्याचा दावा अॅङ सुर्यकांत पोवार यांनी न्यायालयात केला. या पाच जणांना नोटीस बजावण्यात आली असून, त्यांची आणी कोरटकरची समोरासमोर चौकशी करायची असल्याने कोरटकला 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती न्यायालयास केली. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. तट यांनी कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
कोरटकर याची पोलीस कोठडी शुक्रवारी संपल्याने त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत सकाळी 8 वाजताच न्यायालयात आणून ठेवले. न्यायालयाच्या तळमजल्यावरील एका कोठडीत आणून ठेवले होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सुनावणीस सुरुवात झाली. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी न्यायालयात तीन दिवसांच्या पोलीस कोठडीतील तपासाच्या प्रगतीचा अहवाल सांगितला. कोरटकर पसार झाल्यापासून कोठे कोठे राहिला, त्याला आर्थिक मदत कोणी केली. याचा शोध घ्यायचा आहे यामुळे अजून 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती न्यायालयास केली.
यानंतर सरकारी वकील अॅङ सुर्यकांत पोवार यांनी पसार काळात कोरटकरला पाच जणांनी मदत केली आहे. त्यांना समोर बोलवून चौकशी करायची आहे. त्यांचा यामध्ये काही रोल असल्यास त्यांनाही भादविस 249 (सी) प्रमाणे सह आरोपी करण्यात येणार असल्याचे पोवार यांनी न्यायालयात सांगितले. प्रशांत कोरटकर याला पसार होण्यासाठी आणखीन कोणी मदत केली. तो हॉटेलमध्ये कुणाच्या नावाने राहिला आहे. कोरटकरच्या मागे कोणत्या संघटना आहेत काय याचा तपास करावयाचा असल्याने पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती न्यायालयास केली.
अॅड. असीम सरोदे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला हजर होते. धीरज चौधरी हा चंद्रपुर येथील मटका बुकी असून त्यानेच कोरटकरला पळून जाण्यासाठी मदत केली आहे. तो ज्या ज्या मोटारीतून गेला त्याचे सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यायचे आहे. कोरटकर सोबत मोटारीमध्ये कोण कोण होते याची माहिती घ्यायची आहे, यामुळे त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली.
यावर प्रशांत कोरटकरचे वकील अॅङ सौरभ घाग यांनी आक्षेप घेतला. प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यासाठी एकही समन्स पाठविले नाही. पोलिसांकडे संशयीताचा मोबाईल, सीमकार्ड, सीडीआर आणि व्हॉईस सॅम्पल आहेत. यामुळे पोलीस कोठडी देवू नये. या पूर्वीच न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. ती खूप आहे. प्रशांत कोरटकर याच्या घरी तो एकमेव मिळवता आधार असल्याने न्यायालयीन कोठडी मंजूर करण्याची मागणी केली.
- यांची होणार चौकशी
प्रशिक पडवेकर (नागपूर), धीरज चौधरी (चंद्रपुर), राजेंद्र जोशी (इंदोर), साईराज पेटकर (करीमनगर), हिफाजत अली (इंदोर) या पाच जणांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यांना व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठविल्या असून, चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरटकरवर गंभीर गुन्हा दाखल असताना त्यांनी कोरटकरला का मदत केली. याचा शोध घ्यायचा आहे. तेही यामध्ये सहभागी आहेत काय असल्यास त्यांनाही सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी न्यायालयात दिली.
- सरोदे – घाग यांच्यात खडाजंगी
शुक्रवारी न्यायालयामध्ये सुमारे 1 तास युक्तीवाद सुरु होता. यावेळी संशयीत प्रशांत कोरटकर याचे वकील सौरभ घाग आणि इंद्रजित सावंत यांचे वकील आसिम सरोदे यांच्यामध्ये खडाजंगी पहावयास मिळाली. सरोदे यांच्या युक्तीवादावर घाग यांनी तीव्र आक्षेप घेतला. यामुळे या दोघांमध्ये खडाजंगी सुरु झाली. दोघांचे आवाजाचे पारे चढले होते. घाग यांनी ऑनलाईन हजर असलेल्या आसिम सरोदे यांच्या आवाज म्युट करावे असे म्हणताच तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज बंद करणार काय असा प्रतिप्रश्न सरोदे यांनी उपस्थित केला. यावर घाग यांनी तुम्ही मिडीयासमोर नसून कोर्टात आहात असे सांगितले.
- धीरज चौधरीची मोटार जप्त
महाराष्ट्र आणि तेलंगणा बॉर्डरवरुन शुक्रवारी रात्री धीरज चौधरी यांची मोटार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पांढऱ्या रंगाची एसयुव्ही 700 (एमएच 32 सिडी 7720) या नंबरची मोटार जप्त करण्यात आली आहे. कोरटकरने पसार काळात सिकंदराबाद, हैद्राबाद, चंद्रपुर, बैतुल, इंदोर, तेलंगणा या ठिकाणी प्रवास केला आहे. यासाठी त्याने एकूण चार मोटारींचा वापर केला असून, या मोटारींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक नागपूर, तेलंगणा परिसरात ठाण मांडून आहे. कोरटकर ज्या ज्या ठिकाणी राहिला त्या त्या ठिकाणचे सिसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून ताब्यात घेतले जात आहे.








