आपण जगातील काही नावाजलेल्या हॅकर्सबद्दल वाचणार आहोत. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आजचे युग असे आहे की लढाई शस्त्राने कमी आणि तंत्रज्ञानाने जास्त केली जात आहे, परंतु हे तंत्रज्ञान मानवानेच निर्माण केले आणि वापरले. पण अशा दुष्ट मनाच्या माणसांची या जगात कमी नाही. हे लोक कुठलीही सुरक्षा तोडतात आणि एखाद्या व्यक्तीचे किंवा कंपनीचे नुकसान करतात. या कारणास्तव त्यांना संगणक जगतातील हॅकर्स म्हटले जाते. ह्या व पुढील काही लेखामधून तुम्हाला जगातील अशा हॅकर्सची नावे व माहिती सांगणार आहोत, ज्यांनी विविध देशाच्या संगणकांवर हल्ले केले, डेटा चोरला, तो विकला, इतके नव्हे तर अमेरिकेच्या सर्वात मोठय़ा गुप्तचर सुरक्षा सेवेला म्हणजे एफबीआयलाही सोडले नाही.
जोनाथन जेम्स- हॅकर्सच्या जगात जोनाथन जेम्स हे एक प्रसिद्ध नाव आहे. जोनाथनला इंटरनेट जगताचे ‘कॉमेंड’ असेही म्हटले जाते. युनायटेड स्टेट्समध्ये सायबर गुन्ह्य़ासाठी तुरुंगात असलेला पहिला अल्पवयीन होता. पहिल्या गुन्ह्य़ाच्या वेळी दक्षिण फ्लोरिडा येथील हा रहिवासी 15 वर्षांचा होता आणि त्याच्या शिक्षेच्या तारखेला 16 वर्षांचा. जोनाथन जेम्स 15 वर्षांचा असताना त्याने असे कारनामे केले की त्याचे नाव हॅकर्सच्या यादीत जोडले गेले. या तरुण वयात जोनाथनने अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना अडचणीत आणले होते. जोनाथनने अमेरिकन सरकारच्या बऱयाच कागदपत्रांवर ताबा मिळवला होता. एवढेच नाही तर संरक्षण विभाग आणि नासाच्या नेटवर्कवरही जोनाथनचे नियंत्रण मिळवले. नासाचे नेटवर्क हॅक करून जोनाथनने स्पेस स्टेशनच्या ऑपरेशनची संपूर्ण माहिती मिळवली होती. यामुळे नासाला 3 आठवडे आपले काम थांबवावे लागले. पोलीस बराच काळ जोनाथनच्या मागे लागले होते. अखेर 2007 मध्ये जोनाथनला पोलिसांनी अटक केली. जोनाथनने कोणतेही आरोप स्वीकारले नाहीत आणि 18 मे 2008 रोजी त्याच्या पिनेपेस्ट, फ्लोरिडा येथील घरी स्वतः ची गोळी झाडून अत्महत्या केली.
केविन मिटनिक- हा अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड सायबर गुन्हेगार. 6 ऑगस्ट 1963 साली कॅलिफोर्निया प्रांतमध्ये जन्म झाला. लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील जेम्स मनरो हायस्कूलमध्ये व नंतर लॉस एंजेलिस पियर्स कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतले. केविनने असे काही पराक्रम केले आहेत. ज्यामुळे त्याच्यावर दोन हॉलिवूड चित्रपटही बनले आहेत. मिटनिकने पहिल्यांदा 1979 मध्ये, 16 व्या वषी, संगणक नेटवर्कवर अनधिकृत प्रवेश मिळवला. एका मित्राने त्याला आर्कसाठी फोन नंबर दिला, डिजिटल इक्वीपमेंट कॉर्पोरेशन (DEC) ने त्याच s RSTS/E ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी वापरलेली संगणक प्रणाली दिली. त्याने डीईसीच्या संगणक नेटवर्कमध्ये प्रवेश केला आणि कंपनीच्या सॉफ्टवेअरची कॉपी केली, ज्यासाठी 1998 मध्ये त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आणि त्याला दोषी ठरवण्यात आले. त्याला 12 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि त्यानंतर तीन वर्षांची नजरकैद झाली. त्याच्या नजरकैदेच्या शेवटच्या काळामध्ये मिटनिकने पॅसिफिक बेल व्हॉइसमेल संगणक हॅक केले. त्याच्या अटकेसाठी वॉरंट जारी केल्यानंतर, मिटनिक अडीच वर्षांसाठी फरार होऊन पळून गेला. काही दिवसांनी केविनने अमेरिकेचा नॅशनल सिक्मयुरिटी अलर्ट प्रोग्रॅम हॅक केला. या गुन्हय़ाबद्दल पुन्हा एकदा केविनला 2.5 वर्षांची शिक्षा झाली. 5 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर केविनने स्वतःमध्ये बदल केला आणि तो सायबर सिक्मयुरिटी सल्लागार बनला आणि विविध कंपनींना संगणक सुरक्षेबद्दल सल्ला देण्याचे काम करु लागला. केविनने स्वतःची कंपनी उघडली असून आता सायबर सुरक्षेचे काम करत आहे.
गैरी मैकिनॉन- जन्म 10 फेब्रुवारी 1966 हा एक स्कॉटिश सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर आणि हॅकर होता ज्यावर 2002 मध्ये सर्वकाळातील सर्वात मोठा लष्करी संगणक हॅक केल्याचा आरोप होता. मैकिनॉनने ‘सोलो’ या नावाचा वापर करून, फेब्रुवारी 2001 ते मार्च 2002 या कालावधीत नासाची वेबसाईट त्याच्या मैत्रिणीच्या मावशीच्या लंडनमधील घरातून हॅक केली. 13 महिन्यांच्या कालावधीत युनायटेड स्टेट्सचे 97 सैन्य आणि नासाचे संगणक हॅक केले. यूएस अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार त्याने ऑपरेटिंग सिस्टममधून महत्त्वाच्या फाईल्स डिलिट केल्या, ज्याने युनायटेड स्टेट्स आर्मीचे वॉशिंग्टनचे 2000 संगणक नेटवर्क 24 तासांसाठी बंद केले.2011 सप्टेंबरमध्ये त्याने अर्ले नेव्हल वेपन्स स्टेशनवरील 300 संगणक असलेल्या नेटवर्क्समधील लॉग फाईल्स डिलिट केल्या. तसेच मैकिनॉनवर त्याच्या स्वतःच्या संगणकावर डेटा, फाइल्स आणि पासवर्ड कॉपी करुन ठेवल्याचा आरोप होता. यूएस अधिकाऱयांनी सांगितले की त्याने निर्माण केलेल्या ह्या हल्ल्यामुळे उद्भवलेल्या समस्या दुरुस्त करण्याचा खर्च डॉलर 700,000 पेक्षा जास्त होता.
अल्बर्ट गोन्झालेझ- हा एक अमेरिकन संगणक हॅकर, संगणक गुन्हेगार आणि नंतर पोलिसांना माहिती देणारा हॅकर. गोन्झालेझ हा 2005 ते 2007 या काळात एकत्रितरित्या पेडिट कार्ड चोरी आणि त्यानंतर 170 दशलक्ष कार्ड आणि एटीएम क्रमांकांच्या पुनर्विक्रीचा मुख्य सूत्रधार होता. तसे पाहता ही इतिहासातील अशा प्रकारची सर्वात मोठी फसवणूक आहे. गोन्झालेझ आणि त्याच्या साथीदारांनी एसक्मयुएल इंजेक्शनचा वापर करुन संगणक सिस्टीममध्ये बॅकडोअर एन्ट्री मिळवण्यासाठी पॅकेट स्निफिंग (विशेषतः, एआरपी स्पूफिंग) चा वापर करुन डेटा चोरला. अल्बर्ट गोन्झालेझचा जन्म 1981 साली झाला. 12 वर्षांचा असताना त्याला संगणक हाताळायला मिळाला व वयाच्या 14 वषी नासाच्या सिस्टीममध्ये प्रवेश म्हणजे हॅक करण्यात यश मिळवले. त्याने मियामी, फ्लोरिडा येथील साउथ मियामी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले, जिथे त्याला “ट्रबल्ड पॅक लीडर” म्हणून ओळखत होते. डेटा चोरीचे वेगवेगळे आरोप त्याच्यावर लावले गेले. सध्या तो 20 वर्षाच्या सक्त कारावासाची शिक्षा एफएमसी लेक्सींग्टन ह्या कैद्यांसाठी असलेल्या वैद्यकीय तुरुंगामध्ये भोगत आहे. त्याची ऑगस्ट 2023 मध्ये सुटका होण्याची शक्मयता आहे.
पुढील लेखामध्ये आणखी काही हॅकर्सबद्दल पाहू.
-विनायक राजाध्यक्ष








