मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : गोवा चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
पणजी : संपूर्ण देशात आणि जगभरात गोव्याची खरी ओळख ही कोकणी भाषिक राज्य म्हणूनच आहे. म्हणुनच ही भाषा आणि ‘सुंदर म्हजें गोंय’ जगभरातील लोकांसमोर न्यायचे असेल तर कोकणी भाषेतून अधिकाधिक चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे, निर्माते दिग्दर्शकांनी याची नोंद घ्यावी, या संधीचा फायदा घ्यावा व त्या दृष्टीने कार्यरत व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या 10, 11 आणि 12 व्या आवृत्तीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. त्यावेळी करमणूक संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माहिती सचिव सरप्रित सिंग गील, सीईओ आश्वीन चंद्रू, महापौर रोहीत मोन्सेरात, आमदार मायकल लोबो, प्रेमेंद्र शेट, दाजी साळकर, माजी मुख्यमंत्री बाबू कवळेकर, माहिती संचालक दीपक बांदेकर, शर्मद रायतूरकर आणि अभिनेता महम्मद अली यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, स्थानिक भाषेला उत्तेजन देण्यासाठी कोकणी मराठीतून चित्रपट निर्मिती होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. आहे, त्यासाठीच मनोरंजन संस्थेच्या माध्यमातून सरकारचेही प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून दरवर्षी सर्व कलाकारांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्यात येते. त्याशिवाय चित्रपट निर्मितीसाठी अनुदानही देण्यात येते. एवढेच नव्हे तर बालकांमधील कलागुणांना वाव देऊन कलाकार घडविण्यासाठी बालभवन केंद्रे, कला अकादमी, ड्रामा स्कूल, आदींच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यावरून या क्षेत्राबद्दल सरकारची आस्था, आत्मियता दिसून येते. गोव्यात निर्माण झालेल्या असंख्य कलाकारांपैकी अनेकांनी जगप्रसिद्धीही मिळविली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा चित्रपट निर्मितीची 75 वर्षे
गोव्यात 1950 मध्ये पहिल्या चित्रपटाची निर्मिती झाली, त्याला यांदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात गोव्यात अनेक कोकणी चित्रपट निर्माण करण्यात आले, त्यातील अनेकांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले तर काहींनी थेट ऑस्करपर्यंत मजल मारली आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून कोकणी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यात गोमंतकीय कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी महान योगदान दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्याच्या कलाकारांत मोठी क्षमता
चित्रपट महोत्सव हे गोव्यातील कलाकारांसाठी एक आदर्श व्यासपीठ असून त्याचा लाभ घेत कलाकारांनी बॉलिवूड, हॉलिवूडमध्ये जाण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. तेवढी क्षमता त्यांच्यात आहे व चित्रपट महोत्सवांच्या माध्यमातून त्यासाठी आवश्यक प्रोत्साहनही त्यांना नक्की मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
वीस वर्षे गोव्या यशस्वी होतोय इफ्फी
गोव्यासारख्या लहान राज्यात गेल्या 20 वर्षांपासून आम्ही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करत आहोत. त्याशिवाय मराठी चित्रपट महोत्सव आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारी पातळीवर राज्य चित्रपट महोत्सवाचेही आयोजन करण्यात येत आहे. गोव्यातील चित्रपटप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा म्हणजे सूर्य, समुद्र आणि किनारे ही संकल्पना आता अधिक व्यापक बनविण्याची आवश्यकता आहे. या तीन गोष्टीव्यतिरिक्त गोव्यात आणखीही असंख्य गोष्टी आहेत ज्या जगभरात पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी चित्रपटासारखे अन्य माध्यम असू शकत नाही. म्हणुनच चित्रपट निर्मात्यांनी येथील निसर्ग, संस्कृती, अध्यात्म, आरोग्य पर्यटन, अभयारण्ये, ग्रामीण जीवन हे घटक जगासमोर आणण्याचे प्रयत्न करावे.
गोव्याची अद्याप उजेडात न आलेली व्यापकता सर्वदूर पोहोचविण्याचे काम चित्रपटांच्या माध्यमातून व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा चित्रपट याचे मोठे उदाहरण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. डिलायला लोबो यांनी स्वागत केले. जॉली मुखर्जी, मुकेश घाटवळ यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुऊवात झाली. मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर या महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 48 तासांच्या लघु चित्रपट निर्मिती स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. त्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून फूल आनी सावळी या चित्रपटाला गौरविण्यात आले.









