कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान : ‘स्वयंपूर्ण मित्र’ योजनेला 5 वर्षे पूर्ण
पणजी : सरकारी नोकऱ्यांमध्ये मूळ गोमंतकीयांनाच संधी मिळावी याच हेतूने सरकारने कोकणी भाषेचे ज्ञान अनिवार्य केले आहे. त्यामुळे एखादा उमेदवार कितीही गुणवान असला किंवा 15 वर्षांपासून गोव्यात राहात असला तरी त्याला कोकणीचे ज्ञान असणे सक्तीचे ठरविण्यात आले आहे. कोकणीत नापास झालेल्यांना नोकरी दिली जात नाही. त्यामुळे गोमंतकीय युवकांनाच नोकरीची संधी मिळते, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. शुक्रवारी पर्वरी सचिवालयात आयोजित राष्ट्रीय रोजगार मेळ्याअंतर्गत त्यांच्याहस्ते नवनियुक्त 50 सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
त्यावेळी यांच्यासोबत वीजमंत्री सुदिन ढवळीकर, क्रीडामंत्री रमेश तवडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, मुख्य सचिव व्ही. कंदवेलू आदी मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केले. त्याचाच भाग म्हणून आम्हीही कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातून स्टेनोग्राफर, प्रोगामर, तांत्रिक सहाय्यक यासारख्या पदांवर निवड झालेल्या 50 यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना, यार्प्वी सरकारी नोकरीसाठी अनेक परीक्षा द्याव्या लागत होत्या. मात्र, आता त्यात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार एकच परीक्षा ठेवून पारदर्शकता आणण्यात आली आहे. अशा या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करून लोकांनाही चांगली सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
‘स्वयंपूर्ण मित्र‘ पुस्तिकेचे प्रकाशन
‘स्वयंपूर्ण मित्र‘ योजनेला 5 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काढण्यात आलेल्या पुस्तिकेचे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत अनेकांच्या यशोगाथांचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.









