2 तास 10 मिनिटे वेळेची होणार बचत, प्रवासही होणार आरामदायी
प्रतिनिधी/ खेड
कोकण मार्गावर नियमितपणे विद्युतशक्तीवर धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस 20 जानेवारीपासून एक्स्प्रेसऐवजी ‘सुपरफास्ट’ धावणार आहे. यामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसच्या प्रवासात 2 तास 10 मिनिटांच्या वेळेच्या बचतीसह प्रवाशांचा प्रवासही आरामदायी होणार आहे.
कोकण मार्गावर दररोज धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस नेहमीच हाऊसफुल्ल धावत असते. या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे प्रशासनाने नवा बदल केल्याने वेगवान होणार आहे. आतापर्यंत कोकणकन्या एक्स्प्रेस 10111/10112 क्रमांकासह धावत होती. यापुढे कोकणकन्या एक्स्प्रेस 20111/20112 क्रमांकासह धावेल. सीएसएमटी मुंबई-मडगाव सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस सीएसएमटी स्थानकातून रात्री 11.05 वाजता सुटून सकाळी 9.46 वाजता मडगावला पोहचेल.
यापूर्वी कोकणकन्या एक्स्प्रेस दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी मडगावला पोहचत होती. नव्या बदलानुसार 2 तास 10 मिनिटे वेळेची बचत होणार असल्याने प्रवास आणखी सुखकर होणार असल्याने प्रवाशांची कोकण सुपरफास्ट एक्स्प्रेसला सर्वाधिक पसंतीही मिळणार आहे.









