खेड / राजू चव्हाण :
कोकण मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी सदैव कटीबद्ध असणाऱ्या कोकण रेल्वे प्रशासनाने आता प्रवाशांसाठी ‘केआर मिरर’ हे नवीन अॅप लॉन्च केले आहे. हा अॅप प्रवासाच्या प्रत्येक क्षणाचा सोबती बनणार आहे. याद्वारे कोकण रेल्वेच्या निसर्गरम्य प्रवासात अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करणे सोयीचे होणार आहे.
या नवीन मोबाईल अॅपद्वारे रेल्वेगाड्यांच्या लाईव्ह रनिंग स्टेटस्, वेळापत्रक आणि इतर महत्त्वाची माहिती रियल-टाईममध्ये तपासता येणार आहे. यामुळे प्रवासाचे योग्य नियोजन करणे सोयीचे होणार आहे. हे नवे अॅप हाताळणे अत्यंत सोपे आहे. विशेषतः दिव्यांग प्रवाशांसाठी ते अधिक सुलभ बनवण्यात आले आहे. जेणेकरून प्रत्येकजण त्याचा वापर सहजपणे करू शकणार आहेत.
‘केआर मिरर’ हे अॅप अनेक भाषांमध्ये उपलब्ध असल्याने प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार भाषा निवडता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून स्थानकांवर उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांसह इतर सुविधांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. महिलांसाठी हेल्पलाईन, आपत्कालीन अलर्ट आणि तक्रार नोंदवण्याचे पर्याय यासारख्या सुरक्षा सुविधांमुळे प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
कोकणातील किनारपट्टीच्या पर्यटन स्थळांच्या माहितीसह मार्गदर्शिका देखील अॅपमध्ये उपलब्ध आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास फक्त प्रवास न राहता एक सुंदर अनुभव देखील घेता येणार आहे. हे अॅप अॅड्रॉईड वापरकर्त्यांसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. लवकरच ते आयओएस वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.
कोकण रेल्वेचे हे नवे अॅप ‘केआर मिरर’ रेल्वेगाडी स्टेटस्, कोकण रेल्वे वेळापत्रक यासारख्या कीवर्डसाठी अनुकूल असल्याने प्रवाशांना सहज शोधता येणार आहे.
कोकण रेल्वेच्या सेवेला अधिक आधुनिक आणि ग्राहक केंद्रीत बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊलच कोकण रेल्वे प्रशासनाने पुढे टाकले आहे.
- प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होईल
‘केआर मिरर’ हे कोकण रेल्वेच्या प्रवासाला नवीन दिशा देणारे साधन आहे. हे केवळ अॅप नसून प्रत्येक प्रवाशांसाठी एक डिजीटल सोबती आहे. प्रवासाची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळून प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होईल, असा विश्वास कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी व्यक्त केला आहे.








