मृत तरूण आंजणी–बौद्धवाडीचा रहिवासी, शोकाकूलमध्ये अंत्यसंस्कार
रत्नागिरी (खेड) : कोकण मार्गावरून धावणाऱ्या मंगला एक्स्प्रेसच्या धडकेने तालुक्यातील आंजणी–बौद्धवाडी नं. 2 येथील सौरभ सुभाष तांबे (24) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्याने आत्महत्या केली की रेल्वेची धडक बसली, या बाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत तो कामाला होता. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घरातून पाण्याची बाटली घेवून बाहेर पडला होता. मंगला एक्स्प्रेसची धडक बसून त्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला होता. रेल्वे कर्मचारी गस्त घालत असताना रूळानजीक मृतदेह निदर्शनास आला. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर घटनास्थळी पोहचून पोलिसांनी पंचनामा केला. त्याच्यावर रविवारी सकाळी नजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.








