संतोष सावंत
कोकण कन्याळ शेळी बिट्स ही प्रजाती फक्त महाराष्ट्र आणि कोकणापूरती मर्यादित न राहता गोवा राज्याबरोबर आता अंदमान निकोबार या अरबी समुद्रातील लक्षद्वीप मिनीकॉय बेटावर जाऊन पोहचली आहे. कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक शेळी कन्याळ हिने अरबी समुद्रात झेप घेतली आहे. कोकण कन्याळ शेळी प्रजातीला गोवा टू अरबी समुद्र -लक्षद्वीप असा प्रवास करण्यास तब्बल एक महिन्याचा कालावधी लागला आहे. संपूर्ण भारत देशात 22 प्रजातीमध्ये तर महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर संशोधन केलेली कोकणातील दापोली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठच्या अंतर्गत येणाऱ्या निळेली पशुसंवर्धन व दुग्धविकास केंद्रात या शेळीचे संशोधन झाले आणि अखेर ह्या कोकण कन्याळ शेळीने सातासमुद्रात आपली इंट्री केली आहे. 72 किलो वजनाची ही कोकण कन्याळ शेळी प्रजात साउथ आफ्रिकेच्या बोयर या प्रजातीला मागे टाकणार आहे. त्यादृष्टीने प्रवास सुरू आहे. भारतातच नव्हे तर परदेशात कोकण कन्याळ शेळी प्रजातीने आपले लक्ष वेधून घेतले आहे. बारा वर्षांपूर्वी म्हणजे सन 2010 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव- निळेली येथील कृषी पशुसंवर्धन केंद्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक शेळींमधून या शेळीचे संशोधन करण्यात आले होते. राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरो कर्नाल यांच्याकडे इंडिया गोट 1100 व कोकण कन्याळ.0 60 22 अशी 22 व्या अनुक्रमाने नोंद करण्यात आली आहे. भारतीय कृषी अनुसंधान केंद्रामार्फत आताही कोकण कन्याळ शेळी बिट्स प्रजातीला अरबी समुद्रात स्थान मिळाले आहे. या शेळीचे मांस चवदार असते . तसेच ती अधिक वजनाची शेळी आहे.
कोकण कन्याळ शेळीला पालघर ते गोवा या कोस्टल झोन मध्ये सध्या जोरात मागणी आहे. अंदमान निकोबार येथील अरबी समुद्रात मिनीकॉय ,लक्षद्वीप बेट मध्ये असलेले केंद्रातील प्रमुख डॉ. एकनाथ चाकोरकर म्हणाले की , कोकण कन्याळ शेळी बिट्स प्रजाती आता अरबी समुद्रातही स्थिरावली आहे. येत्या काळात संपूर्ण भारत देशातील विविध शेळी प्रजातीमध्ये कोकण कन्याळ शेळी प्रजात सर्वांनाच थक्क करून सोडणार आहे. कोस्टल झोनमध्ये ही शेळी व तिची उत्पत्ती वाढणे गरजेचे आहे. स्थानिक हवामान व स्थानिक खाद्यपदार्थावर अत्यंत दर्जेदार आणि उत्तम अशी ही शेळीची प्रजात वाढते . असे त्यांनी स्पष्ट केले. भारत देशात शेळी -मेंढीच्या मटणाला मोठी मागणी आहे. कोकण कन्याळ शेळी जातीला अनुदान प्राप्त होणे गरजेचे आहे. त्यासाठीचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात आल्याची माहिती डॉ कविटकर यांनी दिली .









