पावसामुळे एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेसला आठ तास विलंब
बेळगाव : कोकण किनारपट्टीवरील धुवाधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस मंगळवारी तब्बल आठ तास उशिराने धावत होती. यामुळे बेळगावहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना वाट पहावी लागली. त्यामुळे प्रवासी रेल्वेस्थानकावरच ताटकळत होते. मागील चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. त्यातच आता मान्सूनही दाखल झाल्याने पश्चिम घाटासह कोकण किनारपट्टीवर धुवाधार पाऊस सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने रस्ते वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या पावसाचा फटका रेल्वे विभागालाही बसला. कोकण रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी आल्याने धिम्यागतीने वाहतूक सुरू होती.
प्रवाशांची गैरसोय
एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस बेळगावमार्गे धावते. या एक्स्प्रेसचे आगाऊ बुकिंग केलेले प्रवासी रेल्वेस्थानकात हजर होते. परंतु रेल्वे मात्र येण्यास विलंब झाला. एक-दोन तास नव्हे तर तब्बल आठ तास उशिराने रेल्वे धावत होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
काही एक्स्प्रेसना जादा डबे
बेंगळूर-मिरज एक्स्प्रेसला 2 जून ते 1 जुलै दरम्यान एक जादा एसी डबा जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर बेंगळूर-बेळगाव एक्स्प्रेसला 1 जूनपर्यंत एक एसी फर्स्ट क्लास डबा जोडण्यात आला आहे. त्याचबरोबर यशवंतपूर-चंदीगड एक्स्प्रेसला एक एसी थ्री टायर डबा जोडण्यात आला आहे.









