रत्नागिरी :
कोकण विभागीय मंडळाने अगदी स्थापनेपासूनच कॉपीमुक्त परीक्षा घेणारे मंडळ म्हणून नावलौकीक प्राप्त केला आहे. या वर्षाच्या 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेनेही यामध्ये भर घातली आहे. एकूणच राज्यातील इतर विभागीय मंडळाशी तुलना करता सिंधुदुर्ग जिह्यासाठी एकही गैरमार्ग प्रकरण आढळलेले नाही. इ. 12 वी च्या परीक्षेसाठी निव्वळ 1 गैरमार्ग प्रकरण भरारी पथकाच्या निर्दशनास आले आहे. ही परीक्षेच्या विश्वासार्हतेसाठी, शिक्षण क्षेत्रासाठी व कोकणातील पालकांसाठी नक्कीच उल्लेखनीय बाब आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अंतर्गत कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यांसाठी 2012 पासून कार्यरत आहे. विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्चच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी परीक्षेच्या दरम्यान रत्नागिरी जिह्यासाठी गैरमार्गाचे केवळ एक प्रकरण भरारी पथकाचे निदर्शनास आले असून सिंधुदुर्ग जिह्यात एकही गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले नाही.
मुख्यमंत्री यांच्या महत्वकांक्षी 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमातील कॉपी विरोधी अभियान या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी या मंडळाकडून पार पाडल्याचे दिसून आले. दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडणे हे आव्हान मंडळासमोर होते. राज्याचे शिक्षण मंत्री व शिक्षण आयुक्त यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन, दान्ही जिह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता समिती अंतर्गत भरारी पथकांची निर्मिती केली होती. प्रत्यक्ष केंद्रांवर राबविलेला धडक कृती कार्यक्रम, प्राचार्य डायट, शिक्षणाधिकारी, सर्व गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी, सर्व महाविद्यालय व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोलाची साथ लाभली.
चालू वर्षी दक्षता समितीचे अध्यक्ष तथा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेद्र सिंह व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, रत्नागिरीच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत व सिंधुदुर्गच्या कविता शिंपी यांच्यासह दोन्ही जिल्हातील सर्व यंत्रणांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे कोकण विभागीय मंडळ हे स्थापनेपासून कायमच कॉपीमुक्त परीक्षा घेणारे मंडळ म्हणून नावारुपास आले आहे.
- सर्वांच्या अथक परिक्षमाचे फलित
कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी कोकण विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष, राजेश क्षीरसागर व विभागीय सचिव, सुभाष चौगुले यांची मंडळ कामकाजावर असणारी मजबूत पकड राहिली. प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीक्षा संचालनासाठी विनातक्रार दिलेली सकारात्मक साथ व मंडळाच्या अथक प्रयत्नातून त्यांच्यामध्ये ऊजलेली कॉपीमुक्त अभियानाची आत्मयिता व अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम हे ही या यशास कारणीभूत आहेत. या बाबी कॉपीमुक्त अभियान यशस्वी होणेसाठी सकारात्मक ठरले.
दीपक पांडुरंग पोवार प्र. विभागीय सहसचिव, कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी








