रस्त्याविना जनरेटर पोहचविण्यास हेस्कॉम अधिकारी असमर्थ
खानापूर : तालुक्यातील पश्चिम तसेच दुर्गम भागातील वीजपुरवठा गेल्या दीड-दोन महिन्यापासून खंडित आहे. नुकताच हेस्कॉमचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी वैशाली एम. यांनी खानापूर तालुक्याचा दौरा केला होता. आवश्यक ठिकाणी जनरेटरने विजपुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. यासाठी गवाळी, पास्टोली, मेंडील, कोंगळा भागात जनरेटद्वारे वीजपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. मात्र जनरेटर नेणाऱ्या वाहनांना रस्त्याची सोय नसल्याने पुन्हा माघारी फिरावे लागल्याने गवाळी, पास्टोली, कोंगळा ही गावे पुढील काही दिवस अंधारातच राहणार आहेत. गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे दुर्गम भागातील तसेच पश्चिम भागातील अनेक गावे अंधारातच अनेक समस्यांना तेंड देत जगत आहेत.
नुकतेच हेस्कॉमचे कार्यकारी संचालक विजया एम. यांनी खानापूर तालुक्याचा दौरा करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक क्रम घेण्याची सूचना केली आहे. जेथे शक्य आहे तिथे खांब उभारुन विद्युतवाहिनी जोडून पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हेस्कॉमचे अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत. मात्र अती दुर्गम भागात दुरुस्तीचे काम होऊ शकत नाही, त्या ठिकाणी जनरेटरने वीजपुरवठा करण्यात यावा, अशा सूचना केल्याने खानापूर तालुका पश्चिम विभागाचे अधिकारी नागेश देवलत्तकर यांनी भाडेतत्त्वावर जनरेटर घेऊन गवाळी येथे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असलेला अबनाळी येथून जाण्यासाठी प्रयत्न केले. मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि दलदल झाल्याने कोणतेही वाहन जाऊ शकत नसल्याने त्यांना पुन्हा माघारी फिरावे लागले. त्यामुळे गवाळी, कोंगळा, पास्टोलीसह अनेक दुर्गम भागात पुढील काही दिवस वीजपुरवठ्याविना अंधारातच काढावे लागणार आहेत.









